Saturday, May 18, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात लम्पीचे थैमान; साडे तीनशेपेक्षा अधिक गावात संसर्ग

जिल्ह्यात लम्पीचे थैमान; साडे तीनशेपेक्षा अधिक गावात संसर्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) जनावरांना लम्पी त्वचारोगाचा (Lampi Disease) प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या (Animal Husbandry Department) आकडेवारीनुसार ३७० गावांमधील ११ हजार ४९१ जनावरांना लम्पीच्या गाठी आल्या आहेत….

- Advertisement -

या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असला तरी शासनाने दिलेल्या लसींमुळे ९२ हजार ५०३ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने आता लसींचा पुरवठा करण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर निधीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या संसर्गजन्य आजारामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत असताना सरकारने हात वर केल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा अधिक पशुधन आहे.

यात दुभत्या जनावरांची संख्या अधिक आहे. त्यात मागील महिन्यापासून जिल्हयातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये लम्पी त्वचा रोग झालेले रुग्ण आढळले आहे.

या प्रादुर्भावाचे प्रमाण प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), निफाड (Niphad), येवला (Yeola), मालेगाव (Malegoan), इगतपुरी (Igatpuri), सिन्नर (Sinnar) या तालुक्यांमध्ये अधिक आहे. पशुसंवर्धन विभागाला आतापर्यंत ३७० गावांमध्ये ११ हजार ४९१ जनावरांना विषाणूजन्य लम्पी या त्वचारोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.

या आजारामुळे जनावरांना गाठी येतात. तसेच डोळे व नाकातून स्त्राव येतो. तसेच रोगट वासरू जन्माला येणे, दुध देण्याचे प्रमाण कमी होणे आदी प्रकार घडतात. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. या आजाराला प्रतिबंधक उपाय म्हणून राज्य शासनाने (Maharashtra State Government) ९० हजारांवर लसी पुरवल्या होत्या.

त्यांचा वापर झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने राज्यातील संबंधित जिल्ह्यांना यापुढे लस (Vaccine) पुरवली जाणार नसल्याचे कळवले आहे. तसेच लसींसाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पशुसंवर्धन विभागाकडे वेगळा निधी नसल्याने त्यांनी सेवा शुल्कातून जमा झालेल्या रकमेतून लसी खरेदी करण्याचे निर्देश तालुका पातळीवर दिले आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरणासाठी (Vaccination) ग्रामनिधीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरणासाठी सरकारने स्थानिक पातळीवर जबाबदारी सोपवली आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे वेगळा निधी नाही. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामनिधी खर्च करू शकेल, असे नाही. यामुळे कदाचित अनेक पशुपालकांना त्यांच्या पाळीव जनावरांना लसीकरण करण्यावर मर्यादा येत आहे. त्यातून या आजाराचा संसर्ग वाढत जाण्याचा धोका अधिक आहे. यामुळे राज्य सरकारने लम्पी त्वचारोगाच्या निर्मूलनासाठी व्यापक मोहीम राबवावी व राज्य सरकारने निधीची तरतूद करावी, अशी मागणी करणारे पत्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना पाठवले आहे.

– संजय बनकर, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प. नाशिक

शासनाच्या निर्देशानुसार सेवाशुल्क व बळकटीकरण रकमेतून लसींची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींनी ग्रामनिधीतून लसींची खरेदी केली आहे. लम्पीचा प्रादुर्भाव आढळल्यास तेथील पाच किलोमीटरच्या परिघातील सर्व पशुंचे लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

– डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या