अलका दराडे
घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…
आजी आणि नातवंडे यांच्यात जेव्हा मायेने संवाद घडतात ते पाहून मुलांचे आई-बाबाही आनंदी होतात. त्यांना माहित असते की आजी इतके चांगले संगोपन कोणी करू शकणार नाही इतका त्यांचा आजीवर दृढ विश्वास असतो.
आजची बरीच मुले आई-बाबा नोकरीवर गेले की घरी आजीबरोबर असतात. आजी व नातवंडे दिवसभर एकमेकांशी आपुलकीच्या नात्याने बोलत असतात. काही वेळेस गच्चीतील बागेवरून त्यांच्यात संवाद होतो. मुलेही आजी सांगत असलेली माहिती लक्ष देऊन ऐकतात. झाडाचे नाव व त्या झाडाची बारीक सारीक माहिती मुलांना आजीच्या ह्या नैसर्गिक शाळेत मिळते. त्या झाडाच्या फुलांचा व फळांचा काय उपयोग आहे हे तिच्याकडून समजते. आयुर्वेदातील झाडांचे महत्त्व मुलांना समजते. गुलकंद, मोरावळा वा च्यवनप्राश शक्तिवर्धक व बुद्धिवर्धक का आहे ते मुलांना समजते. आवळा व गुलाबाप्रमाणे अनेक फळे व फुले ह्या निसर्गाच्या शाळेत आपली मुले शिकतात. आजीची निसर्गाची शाळा विनामूल्य पण लाख मोलाची असते. आजी सहज मुलांना आवळा, संत्री, मोसंबी, लिंबू, सफरचंद अशा फळांमधून आरोग्यवर्धक सी व्हिटॅमिन मिळते हे मायेने सांगते व मुलांना ही फळे खाण्याची गोडीही लावते.
हा संवाद पुढे वाढत जातो व मुले विचारतात आजी, वृक्षारोपणाचे महत्त्व काय आहे सांग ना? ह्या प्रश्नाने तर आजी खूश होते. आजी सांगते बाळांनो आपण आज रोपे लावली तर त्याचा फायदा पुढील पिढ्यांना होतो. तुम्ही आज आंबे खाता पण झाडे मागच्या पिढीने लावली आहेत. तुम्ही कायम रोपे लावा. झाडांची मुळं जमिनीत पाणी धरून ठेवतात त्यामुळे झाडाखाली आपल्याला गार वाटते. झाडांमुळे दिवसा ऑक्सिजन मिळतो. पक्षी घरटी करतात. आपल्याला पक्ष्यांना फुले व फळे मिळतात. ही फुले व फळे विपूल असतात. मुलंही मनातले प्रश्न विचारतात, आजी, म्हणूनच मामाकडे गेल्यावर फ्रेश वाटते ना! आई बरोबर तिथे शेतावर गेलो की छान मोकळेपणा व हवाहवासा गार वाराही मिळतो. आजी यावर परत म्हणते बाळांनो निसर्गाशी नातं जोडा कारण निसर्ग आपला गुरु आहे. त्याच्या सान्निघ्यात जीवनाचे अजरामर तत्वज्ञान मिळते शिवाय सुट्टीचा आनंदही मिळतो व पुढील अभ्यास करायला मनाने व शरीराने तुम्ही ताजे होता. आजीचा प्रत्येक शब्द मुलांच्या बुद्धीपटलावर कायमचा कोरला जातो नि आजीची शिकवण अंगीकारून ते आपल्या उज्वल भविष्याकडे डोळसपणे पहायला शिकतात.
(क्रमश:)