विविध स्पर्धा परीक्षांच्या भुलभलैय्याचा अस्वस्थ करणारा अनुभव समाजाने पुन्हा एकदा घेतला. एका व्यावसायिकाकडे काही लाखांची खंडणी मागणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. तो युवक पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यात त्याला सतत अपयश येत होते. त्या प्रयत्नांमध्ये तो कर्जबाजारी झाला. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने खंडणीवसुलीचा मार्ग निवडला असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठीचा खर्च सर्वानाच परवडणारा नसतो. अनेकांचे पालकही प्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्याची मुभा देतात. तथापि यश सर्वानाच मिळते का? अनेकांना अपयश पचवता येत नाही.
मग आत्म्हत्यासारख्या घटनाही अधूनमधून घडतात. स्पर्धा परीक्षेचे गारुड मनावर झालेली मुले प्रयत्न करत राहातात. आणि मग एक दिवस त्यासाठी झालेल्या खर्चाचे आकडे त्यांच्या डोळ्यासमोर नाचू लागतात. उपरोक्त खंडणी घटनेतही कदाचित तसेच घडले असावे. स्पर्धा परीक्षेकडे वळतांना किती युवा साकल्याने विचार करत असतील? या परीक्षा देण्यामागचा त्यांचा उद्देश किती जणांना निश्चित माहित असतो? अधिकारी झालेल्यांचे सत्कार, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या अभिनंदनाचे लागलेले फलक, त्यांची व्याख्याने आणि लाल दिवा याची म्हणजे थोडक्यात या ग्ल्यमरची युवांना भुरळ पडत असावी का? काही जण त्यामुळेच परीक्षांच्या मागे लागत असावेत का? या परीक्षांच्या अभ्यासाचा आवाका प्रचंड आहे. त्या अभ्यासासाठी करावी लागणारी सततची जागरणे, सतत चहा पिण्याची लागलेली सवय आणि अभ्यासाचा ताण याचा अपरिहार्य परिणाम आरोग्यावर होतो. आयुष्याला ध्येय हवेच. ते असले म्हणजे त्याचा ध्यास लागू शकतो.
तथापि परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकण्याआधी अधिकारी का व्हायचे आहे? तशी क्षमता आहे का? त्याचा खर्च झेपेल का? ताण सोसवेल का आणि परत परत प्रयत्न करण्याइतका संयम त्यांच्याकडे आहे का? याचा विचार फक्त युवांनी नव्हे तर त्यांच्या पालकांनी देखील करायला हवा. मुलांची कुवत पालकांनाच जास्त माहित असते. या परीक्षांचे जग अत्यंत अस्थीर आणि कठीण असते. यश मिळेलच याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. यश मिळाले तरी सरकार दरबारी त्वरित नेमणूक मिळेल याची शाश्वती कोणी देऊ शकेल का? तेव्हा या जगात प्रवेश करणाऱ्या मुलांकडे नेहमीच दुसरा पर्याय ( प्लॅन बी) असावा.
पर्यायाचे महत्व युवांना देखील कळायला हवे. अनेक तरुण अधिकारी देखील तोच सल्ला देतात. स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळाले तर कोणत्या क्षेत्रात करियर करायला आवडेल याचा शोध मुलांनी घ्यायला हवा. त्याचा देखील पाठपुरावा करायला हवा. केवळ स्पर्धा परीक्षेतीलच नव्हे तर कुठलेही अपयश स्वीकारायला शिकावे. कोणत्याही परीक्षेतील अपयश म्हणजे शेवट नसतो. अपयश ही यशाची पहिली पायरी हे इथेही लागू पडते. वैयक्तिक स्वप्न, इच्छा आणि वास्तव समजून घेतले तर कोणत्याही परिस्थितीत माणूस तरुन जाऊ शकतो हे युवापिढीने लक्षात घ्यायला हवे.