मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत असून मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे.
दरम्यान लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये तर एका सरपंचाने स्वत:ची कारच पेटवून दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वीच ही चारचाकी घेतली होती. मात्र, काल झालेल्या मराठा आंदोकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करत करत त्यांनी फुलंब्री येथील पाल फाटा येथे आज आपले वाहन जाळले. यावेळी मंगेश साबळे यांच्यासोबत काही मराठा आंदोलकही होते.
माध्यमांना प्रतिक्रीया देताना मंगेश साबळे म्हणाले, आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वत:ची गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला जाळून घेऊन निषेध व्यक्त करु. सरकारने दोन दिवसांत ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतला जाळून घेऊ. मंगेश साबळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही निषेध केला. फडणवीसांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी त्यांनी केळी. मंगेश साबळे म्हणाले, जालन्यात न्याय हक्कांसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. मात्र, जेथे आपल्या लोकांवर काठ्या पडत असेल, आमच्या आई-बहिणींच्या डोक्यातून रक्त निघत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.