जालना | Jalana
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत असून मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे.
याच दरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी काय-काय घडलं याविषयी माहिती दिली. त्यांनी उदयनराजे यांची आपल्याकडे विचारपूस करायला आल्याबद्दल आभार मानले. तसेच उदयनराजे यांनी सांगितलं तर आपण आताच उपोषण सोडून घरी जायला तयार आहोत, असं मनोज जरांगे म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी एक अनोखी घटना घडली. उदयनराजे मनोज जरांगे यांच्यासोबत मंचावर बसलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील तिथे दाखल झाले.