संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर साखळी उपोषण सुरू आहे. संगमनेरात बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या साखळी उपोषणास पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे भेट देण्यासाठी आले असता मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी ‘परत जा, परत जा विखे पाटील परत जा’ म्हणून घोषणा देत निदर्शने केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यभरात सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे. सत्ताधारी पुढार्यांना अनेक गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे.
संगमनेरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे साखळी उपोषणास भेट देण्यास आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी ‘परत जा, परत जा विखे पाटील परत जा’ म्हणून घोषणाबाजी केली. याप्रसंगी पंकज पडवळ म्हणाले, सत्ताधारी मंत्र्यांनी उपोषणास पाठिंबा देण्यापेक्षा कायदा मंजूर करावा, असे सांगत सत्ताधारी पक्ष व मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी झाली. वडगावपानमध्ये पुढार्यांना गाव बंदी आहे. महसूल मंत्री विखे पाटील येथे उद्घाटनासाठी आले असता येथे तरुणांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्रेय घेवू नका – सौ. रुपाली थोरात
वडगावपानमधील विविध विकास कामांत कोणताही संबंध नसताना फक्त राजकीय उद्देश ठेवून सत्ताधारी भाजपचे मंत्री उद्घाटनास आले. खरे तर गाव बंदी आहे, असे असताना जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम सत्ताधारी व त्यांचे समर्थक करत आहेत. यांना जनता माफ करणार नाही, अशा शब्दांत वडगावपान ग्रामपंचायत सदस्य सौ. रुपाली थोरात यांनी निषेध व्यक्त केला आहे.
‘घोषणाबाजी करणारे काँग्रेसची पिलावळ’
काँग्रेसचे नेते या मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, मराठा आरक्षणाला चिथावणी देत आहेत, काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी सत्तेत असतांना काही केले नाही. अडीच वर्षे त्यांची सत्ता असताना त्यांनी काही केले नाही, काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते हे ओबीसींना आरक्षण द्या, असे सांगत आहेत, काँग्रेसची ही दुटप्पी भूमिका आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यावेळी काही लोकं कोर्टात गेले, मात्र त्यानंतरच्या सरकाराने ते आरक्षण टिकवले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, आणि लवकरात लवकर उपोषण सोडावे. आता घोषणाबाजी करणारे ही काँग्रेसचीच पिलावळ आहे, जेव्हां स्थानिक लोकप्रतिनिधी आले होते तेव्हा हे कुठे गेले होते? असा सवाल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला.