Friday, November 1, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : मराठा क्रांती मोर्चाचा नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मविआच्या...

Loksabha Election 2024 : मराठा क्रांती मोर्चाचा नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मविआच्या उमेदवारांना पाठिंबा

नाशिक | Nashik

देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) चार टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले असून येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांसह विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नाशिक लोकसभेसाठी (Nashik Loksabha) महायुतीकडून हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दिंडोरीसाठी महायुतीकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील लढतींकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -

त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा उद्रेक या दोन्ही मतदारसंघात दिसून आला होता. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघातील काही भागांत जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. तसेच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सभा देखील घेतल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणावर असल्याने या समाजाची भूमिका निर्णयाक ठरणार होती. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चा कोणत्या पक्षांच्या पाठीमागे उभे राहणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यानंतर अखेर आज या दोन्ही मतदारसंघाबाबत मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या, मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणाऱ्यांना पाडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि दिंडोरीसाठी भास्कर भगरे (Bhaskar Bhagre) यांना पाठिंबा देत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या या निर्णयाने स्वतःला मराठा आरक्षणाचे पदाधिकारी म्हणून घोषित केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर (Karan Gaikar) यांना मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनाही मराठा क्रांती मोर्चाच्या या निर्णयाने धक्का बसला आहे. मराठा क्रांती मोर्चाने नाशिक (Nashik) शहरात मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते. या उपोषणात कोणताही नेता सहभागी झाला नव्हता. त्यावरूनही आज पुन्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या