जालना | Jalana
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे अजूनही ठाम आहेत. दरम्यान त्यांनी सरकारला २९ ऑगस्टची डेडलाई दिली होती. मात्र आता मनोज जरांगेंनी पुन्हा मोठी घोषणा केली असून २९ सप्टेंबर ऐवजी जरांगे हे १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या एक वर्षात त्यांच्या आंदोलनाने राज्यात मोठ्या हालचाली घडल्या आहे. या आंदोलनाचा महायुतीला लोकसभेच्या निवडणुकांत बसलेला पहायला मिळाला.मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून समाजाला वाट पाहावी लागली आहे. सरकारने कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या एक दिवसाअगोदर १७ सप्टेंबर पासून उपोषणाची सुरुवात करणार आहे. ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. १७ सप्टेंबरपासून अमरण उपोषण करणार हे उपोषण कठोर असणार असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत अंतरवाली सराटीत अनेक घडामोडी घडल्या. मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. त्यांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर धनंजय मुंडे हे सुद्धा अंतरवाली सराटीत दाखल झाले आणि त्यांची भेट घेतल्याची बातमी येऊन ठेपली. त्यानंतर नेमके कोणती खलबते झाली ज्यामुळे जरांगे पाटील यांनी अचानक उपोषणाचे हत्यार उपसले हे समोर आलेले नाही.
मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात २८८ उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतो. तसे घडल्यास यावर भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा