कोपरगाव |तालुका प्रतिनिधी|Kopargav
जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी जमलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरासह तालुका बंद ठेवून मराठा बांधवांनी निषेध आंदोलन केले. या आंदोलनामध्ये सर्वधर्मीय नागरिक व विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शाळा-महाविद्यालयांसह, व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी मराठा समाजाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज बांधव सकाळी एकत्र आले. तेथे शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मराठा समाजातील सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान अनंत डीके, साकेत नराडे, विनोद थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाला सुरूवात झाली. दिवसभर शहरातील दुकाने बंद होती. रस्त्यावर शुकशुकाट होता.
यावेळी माजी आमदार अशोक काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, विजय वहाडणे, पराग संधान, बाळासाहेब आढाव, विजय रावसाहेब आढाव, योगेश खालकर, विनय भगत, कृष्णा आढाव, बाळासाहेब देवकर, बाळासाहेब रूईकर, मनोज नरोडे, अनिल गायकवाड, अशोक आव्हाटे, स्वप्नजा वाबळे, विमल पुंडे, बीणा भगत, अनिल सोनवणे, संदीप वर्पे, विजय आढाव, बाळासाहेब जाधव, अनिरूद्ध काळे, विकास आढाव, विजय जाधव, प्रसाद आढाव, चंद्रशेखर म्हस्के, शैलेश साबळे, मुकूंद इंगळे, राजेंद्र आभाळे, प्रविण शिंदे आदींनी आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या. यात लाठीमाराचा निषेध करीत मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार संदीपकुमार भोसले व पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले, मराठा समाज हा सर्व समाजाचा पालकत्व स्वीकारलेला समाज आहे. या समाजाने सर्वांना आरक्षण दिले आहे. मात्र मराठ्यांना नाही, मुख्यमंत्री यांच्या सुचनेमुळे हा लाठीचार्ज झाला आहे. इंग्रजाप्रमाणे मराठ्यांवर हे सरकार अत्याचार करत आहे. कोणत्याही मराठा बांधवांनी निवडणूक न लढवता याचा निषेध करावा व आपल्या नेत्यांना आपली गरज असून त्यांनाही याबाबत जाब विचारावा, असेही झावरे म्हणाले.
अॅड. योगेश खालकर म्हणाले, 1982 साली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मोर्चा नेला. मात्र आजपर्यंत मराठा समाज याच मागणीसाठी संघर्ष करत आहे. मराठ्यांचे 58 मोर्चे शांततेत पार पडले. मात्र तरीही आरक्षण रद्द केले. 70 टक्के आमदार हे मराठा असून हे फक्त जात लावण्यापुरते आहे. स्वाभिमानी मराठे कमी उरले आहे. आपले पोर फक्त शिपाई होत आहे. आपण दिवस-रात्र एक करून नेते निवडून आणतो तेच आता लक्ष देत नाही.
कोपरगाव बंदला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दर्शविला. व्यापारी महासंघातर्फे काका कोयटे, सुधीर डागा, मुस्लिम समाजाचे इम्तीयाज अत्तार, फकिर कुरेशी, चाँदभाई पटेल, माळी समाजातर्फे विरेन बोरावके, मातंग समाजाच्यावतीने अॅड. नितीन पोळ, वंचित बहूजन आघाडीच्यावतीने शरद खरात, आरपीआयच्यावतीने जितेंद्र रणशूर, शीख समाजातर्फे कलविंदर दडीयाल यांनी घटनेचा निषेध करीत बंदला पाठिंबा दर्शविला.