मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे शुक्रवार (दि.२९) पासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक देखील मुंबईत दाखल झाले आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून, सकाळपासून मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरून या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.
तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने (State Government) हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील मराठा समाजातील पात्र लोकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला आता ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने काढला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsath) यांनी दिली आहे.
दरम्यान, तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून (Government) करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आला असून सदर समितीला २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे नव्या शासन निर्णयात म्हटले आहे.
समिती नेमकी काय आहे?
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रे काढणे सोपे व्हावे, यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आला होता.
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून, सरकारकडून अद्याप कुणीही त्यांची भेट घेतलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु झाली आहे.या बैठकीसाठी उपसमितीचे सदस्य दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर सदस्य देखील हजर आहेत. याशिवाय काही महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी देखील विखे पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? किंवा बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





