जालना | Jalana
गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याचं समोर आलं आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. यावेळी त्यांना चालणंही कठीण झालं होतं. दरम्यान उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. आज सायंकाळी पाच वाजता ते उपोषण सोडणार असल्याची माहिती आहे.
यावेळी बोलताना मनोज जरंगे म्हणाले, आज प्रत्येक शिक्षक अन पोलीस आरक्षणाची वाट बघतोय. आज कोणतेच क्षेत्र असं नाही की तो आरक्षणाची वाट बघत नाही, प्रत्येक क्षेत्रातील मराठा आज आरक्षणाची वाट बघत आहे. फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे, माझा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघतोय. तुम्हाला संधी आहे ही संधी वाया जाऊ देऊ नका, मी आता आचारसंहितापर्यंत राजकीय भाषा बोलणार नाही पण तोपर्यंत आरक्षण दिलं नाही तर त्यानंतर मी कोणालाच सोडणार नाही. माझी भूमिका माझ्यासाठी नाही तर माझ्या समाजासाठी महत्वाची आहे. ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
तसेच, माणूस सलाईन घेतली तरी मरतो हे खरंय, तो केवळ २७ दिवस जगू शकतो. रात्री कलेक्टर साहेब, एसपी साहेब आले होते. मी तुम्हाला माझ्या वेदना दाखवत नाही. मात्र काल खूप त्रास झाला म्हणून त्या वेदना दिसल्या. मी हायकोर्टाचा सन्मान करतो, त्यांनी सांगितलं होतं सलाईन घ्या म्हणून मी सलाईन घेतल्या. चिखलात इथं येणाऱ्या बांधवांचे हाल होत आहेत, एकट्या फडणवीस साहेबांसाठी ९ दिवसांचा कडक उपवास झालाय. निवडणुकीपर्यंत जर आरक्षण दिल नाही तर सगळी निवडणूक बिघडवणार आहे, माझ्या स्वतःसाठी मी आंदोलने करीत नाही, असं ते म्हणाले. यावेळी मनोज जरांगेंच्या डोळ्यात पाणी आलं होतं.