मुंबई | Mumbai
गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आझाद मैदानावर उपोषण (Maratha Reservation Protest Azad Maidan) करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले असून, शहरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) मुंबईमधील वाहतुकीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर मराठा बांधवांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबईत सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज (०१ सप्टेंबर) रोजी बंद करण्यात आले आहेत. या वाहतुकीतील महत्त्वाच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव फोर्सही देण्यात आली आहे.
तसेच वडाळा वाहतूक पोलिसांना ३५ तर आझाद मैदान पोलिसांना ३५ अशी ७० जणांची वाढीव कुमक देण्यात आली आहे. त्यासोबतच मुंबईमधील इतरी काही मार्गांवरील वाहतूक बदलण्यात आली आहे. तसेच पर्यायी मार्ग दाखवणे, वाहनांना वळवून लावणे यांसारख्या उपाययोजना सुरू आहेत. दुसरीकडे सरकार आंदोलकांमध्ये तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत असून, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या मार्गांवरही वाहतूक बदल!
- मेट्रो जंक्शन ते CSMT च्या दिशेने येणारा आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगर पालिका मार्ग बंद.
- जे.जे उड्डाणपुल मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या मुंबई पोलीस आयुक्तालयामार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
- हजारीमल सोमानी रोड जो फॅशनस्ट्रीटहून CSMT कडे येणारा आणि आझाद मैदानला लागून असलेला मार्गही बंद.
- हुतात्मा चौकहून सीएसएमटीच्या दिशेने येणारा वाहतूक मार्गातही बदल.
- मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीनड्राईव्ह जंक्शन हे मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवले जाणार आहेत.
- मराठा आंदोलकांच्या वाहकांमुळे बंद असलेला फ्री वे उद्या वाहतूकीसाठी खुला राहणार आहे.
मुंबईत कुठे कुठे वाहतूक कोंडी?
- सायन–पनवेल हायवे : वाशी टोल नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
- वाशी ते मानखुर्द : संपूर्ण पट्ट्यात वाहनांची लांबच लांब रांग लागल्या आहेत.
- पश्चिम द्रुतगती महामार्ग : बोरीवलीहून वांद्रेच्या दिशेने वाकोला, विलेपार्ले आणि अंधेरी परिसरात प्रचंड कोंडी दिसत आहे.
- सांताक्रुझ-वाकोला उड्डाणपूल : खड्ड्यात मोठा पॅच मारल्यामुळे वाहतुकीचा वेग पूर्णपणे ठप्प झाला आहे.




