मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या सात दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावत आहे. यानंतर त्यांनी किमान पाणी तरी घ्यावं अशी विनंती मराठा समाजाच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती. अखेर जरांगे यांनी मराठा समाजाचा मान ठेवला आहे. मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे.
मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अन्न-पाणी घेणे बंद केल्याने तब्येत खालावल्यानंतर काल मराठा आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मनोज जरांगे यांनी काही घोट पाणी घेतले होते. त्यानंतर जनतेच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा ‘लालपरी’ला फटका; अनेक ठिकाणी बससेवा ठप्प
दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहे. त्यानुसार, जरांगे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर थोड्याच वेळात माध्यमांशी बोलण्याचा निर्णय जरांगेनी घेतल आहे. जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
मराठवाड्यात तोडफोड, जाळपोळीच्या घटना
मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आली असून माजलगाव येथे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरावर दगडफेक करत घर पेटवून देण्यात आले तर बीड शहरातील नगर रोडवरील आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर राहत असलेल्या बंगल्याला आग लावण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बसेसची देखील तोडफोड करण्यात आली आहे.