मुंबई । Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राजधानी मुंबईत लाखो आंदोलक जमल्याने सरकारवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांचा वेग वाढवला असून, आज पुन्हा एकदा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्त्या मनोज जरांगे पाटलांनी मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, “काल सरकारी शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी जरांगे पाटलांनी सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली.” मात्र, या मागणीमध्ये काही कायदेशीर अडचणी असल्याने, त्या बाबी तपासल्या जातील आणि त्यानंतर पुन्हा जरांगे पाटलांशी चर्चा केली जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ५ वाजता राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीत विधी आणि न्याय विभागाचे सचिव तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग असेल. या बैठकीत मराठा आरक्षणातील कायदेशीर गुंतागुंत सोडवण्यावर भर दिला जाईल. या बैठकीनंतर अंतिम प्रस्ताव तयार करून तो मनोज जरांगे यांना पाठवला जाईल, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनेत बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवणे हाच मराठा आरक्षणावरचा पर्याय असल्याचे म्हटले होते. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. “मला शरद पवारांचे आश्चर्य वाटते. ते चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि केंद्रातही मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर त्यात मराठा समाजाचा समावेश करावा, असे त्यांना का वाटले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी पवारांना दिला.
या सगळ्या घडामोडींमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकार कायदेशीर मार्ग शोधत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




