Friday, October 25, 2024
Homeनगरआरक्षण आंदोलनाला पाठिंब्यासाठी नेवाशात उपोषण सुरु

आरक्षण आंदोलनाला पाठिंब्यासाठी नेवाशात उपोषण सुरु

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणासाठी 40 दिवस दिले होते. या मुदतीत आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी अंतरवाली सराटी येथे बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. त्यानुसार जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौक येथे सकल मराठा बांधवांनी आमरण, साखळी व चक्री उपोषणास प्रारंभ केला आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ अशी मागणी करत जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी मराठा आंदोलकांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवराय’ तसेच ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ आदी घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.

आंदोलनास नेवासा तालुकाभरातून विविध सामाजिक संघटनांसह समाजाचा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात मराठा समाज बांधवांसह इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आंदोलनाची व्यापकता वाढवित आहेत. लवकरात लवकर मराठा आरक्षण लागू करावे अशी मागणी देखील करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी प्रकाश निपुंगे, संजय मारकळी व गणेश चांगुले या मराठा युवकांनी शासनाकडून आरक्षण देण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ मुंडन केले. तसेच उपोषणस्थळी प्रारंभी संतप्त आंदोलकांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेस चप्पल मारो आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.

कुमावत (बेलदार) समाज सेवा संघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना, उबाठा शिवसेना शहर, धाडस सामाजिक संघटना, ब्राह्मण समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, नेवासा तालुका काँग्रेस कमिटी, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सिंधी पंजाबी बांधव, कहार कर्मचारी समाज ट्रस्ट, वडार समाज, जैन संघटना, नेवासा तालुका वकील संघ, भारत राष्ट्र समिती, जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन, आम आदमी पार्टी आदी पक्ष-संघटनांनी उपोषणास पाठिंबा व्यक्त केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या