Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : मराठा आरक्षण रॅलीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त

Ahilyanagar : मराठा आरक्षण रॅलीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त

शेवगाव ते पारनेर मार्गावर सुमारे 850 अधिकारी-कर्मचारी तैनात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार (दि. 27) अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघणार्‍या ऐतिहासिक रॅलीसाठी नगर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेवगाव पोलीस ठाणे हद्दीपासून पारनेर पोलीस ठाणे हद्दीपर्यंत हा बंदोबस्त तैनात असणार आहे. सुमारे 100 अधिकारी व सुमारे 750 कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहे.

- Advertisement -

जरांगे यांची रॅली पैठणमार्गे जिल्ह्यात कर्‍हेटाकळी (ता. शेवगाव) मार्गे दाखल होऊन घोटण, तळणी, शेवगाव शहर, वडुले, ढोरजळगाव, निंबे नांदूर, मिरी, दत्ताची शिंगवी, माका, पांढरीपूल, जेऊर, शेंडी बायपास, दुधडेअरी चौक, नवनागापूर एमआयडीसी, निंबळक बायपास, नेप्ती, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, काळेवाडी (ता. पारनेर) मार्गे आळेफाटा (जि. पुणे) येथे रवाना होणार आहे. रॅलीचे मुंबईत 29 ऑगस्ट रोजी आगमन होणार असून, मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे.

YouTube video player

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे बंदोबस्ताचे प्रमुख प्रभारी असतील. यासाठी तीन सेक्टरनिहाय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सेक्टर 1 साठी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती (शिर्डी विभाग), सेक्टर 2 साठी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने (नगर ग्रामीण), तर सेक्टर 3 साठी पोलीस उपअधीक्षक गणेश उगले (आर्थिक गुन्हे शाखा) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेवगाव, पाथर्डी, सोनई, अहिल्यानगर तालुका, एमआयडीसी आणि पारनेर पोलीस ठाण्यांना बंदोबस्त योजना तयार करून सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

बंदोबस्तात 850 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत. यात 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 3 उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक 14, सहायक व उपनिरीक्षक निरीक्षक 79, पुरूष अंमलदार 639, महिला अंमलदार 80 व एक दंगल नियंत्रण पथकाचा समावेश आहे. तसेच बीडीडीएस पथकाव्दारे घातपातविरोधी तपासणी केली जाणार असून, बॅरिकेड्स, वॉकीटॉकी, शासकीय वाहने, रस्सी, दुर्बिणी आदी साहित्याचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या रॅली मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता व संयम बाळगावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...