शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिर्डीत साखळी उपोषण सुरू असताना सोमवारी राहाता तालुका सकल मराठा समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू करून तरुणांनी शिर्डी शहरातून गाढवाच्या गळ्याला सदावर्तेंचे पोस्टर लावून धिंड काढून राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवरील पुढार्यांच्या पोस्टरला काळे फासून शिर्डी शहर संपूर्ण दिवस बंद ठेवून शासनाचा जाहीर निषेध नोंदविला.
शिर्डी शहरात राहाता तालुका सकल मराठा समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणानंतर रविवारी कॅण्डल मार्च काढला. सोमवारी शिर्डी शहर शंभर टक्के बंद ठेवून 7 मराठा समाजाच्या तरुणांनी अमरण उपोषण बसायचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी सदावर्ते याचे फोटो असलेला पोस्टर दोन गाढवांच्या गळ्यात बांधून शिर्डी शहरातून धिंड काढण्यात आली. तसेच नारायण राणे यांचा निषेध करण्यासाठी कोंबडा आणून कोंबडी चोर अशा घोषणा करत युवकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. बसस्थानकात जाऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा फोटो असलेल्या पोस्टला काळे फासत तसेच नगरपरिषदेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर जाऊन युवकांनी राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केले.
यावेळी गणेश कोते, सुजित गोंदकर, वैभव कोते, विकास गोंदकर, किरण कोते, विशाल भडांगे, महेश गोंदकर, अनिल गोंदकर, प्रीतम गोंदकर, प्रसाद बोठे या युवकांनी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध केला. सोमवारी सकाळपासूनच शिर्डी शहरातील साई संस्थान प्रसादालय व भक्ती निवास वगळता शहरात हॉटेल, लॉजिंग व विविध वस्तूंची दुकाने संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. शिर्डीत येणार्या साईभक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.
राज्य शासन मराठा आरक्षण देण्यासाठी कुठलेही प्रकारचे निर्णय घेत नसल्याने शिर्डीत सोमवारपासून सचिन चौगुले, अनिल बोठे, रवींद्र गोंदकर, नितीन कोते, प्रशांत राहणे, प्रकाश गोंदकर, कानिफ गुंजाळ या सात युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी सुरू झालेल्या या आमरण उपोषणास कमलाकर कोते, रमेश गोंदकर, हरिश्चंद्र कोते, ताराचंद कोते, यश कोते, विकास कोते, तानाजी कोते तसेच विविध समाज बांधव व परिसरातील नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दिला. साखळी उपोषण सातत्याने सुरूच राहणार असून आरक्षण तात्काळ जाहीर न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मुस्लिम, धनगर, माळी, बहुजन वंचित आघाडी, परीट व राहाता तालुका वकील संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
सोमवारी शिर्डी ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिर्डी बंदचे आवाहन केले होते. शहरातील सर्व समाज बांधवांनी गाव बंद ठेवून पाठिंबा दिला. त्याबद्दल शिर्डी सकल मराठा समाजाच्यावतीने शहरातील सर्व व्यावसायिक व सर्वच समाज बांधव यांचे आभार. सरकारने आता अंत पाहू नये. शांततेत चाललेले हे आंदोलन हिंसक होऊ नये यासाठी तात्काळ आरक्षण जाहीर करावे.
– दत्तात्रय कोते, शिर्डी