मुंबई | Mumbai
राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Society) आरक्षण (Reservation) देण्यासाठी आज एक दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. नुकतेच हे अधिवेशन सुरु झाले असून अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सुपूर्द केलेल्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार आता मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, या दहा टक्के आरक्षणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, असे म्हणत सरकावर हल्लाबोल केला…
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी केली पाहिजे, याची मागणी आम्ही केली आहे. करोडो मराठा बांधवांची ओबीसीतून आरक्षणाची (OBC Reservation) मागणी आहे. मात्र, त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असून वेगळ्याच गोष्टी समोर आणत आहे. त्यामुळे हे अजिबात चालणार नाही. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी पाहिजे. नाही तर उद्या आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू, असे मनोज जरांगेंनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, राज्य सरकारने आरक्षणाची सगळी प्रक्रिया केली हे खरे आहे. मात्र, खुल्या न्यायालयात क्युरेटीव्ह पिटीशनची सुनावणी होणार आहे का? खुल्या न्यायालयात झाले नाही तर मराठ्यांच्या नुकसान होणार आहे. त्यामुळे हे फक्त ठिगळं देणं सुरू आहे. नोंदी सापडल्या आहेत म्हणाल्यावर त्यांना टेन्शन का आहे? आरक्षण देऊन टाका. समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. नाही तर आंदोलन अटळ आहे. राज्यातील एक नागरिक उपोषण करून मरो, आत्महत्या करो. पण मी माझाच तोरा गाजवणारा, अशी जर मग्रुरी असेल तर आम्ही मराठा आहोत, पुन्हा रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही, असा इशाराही मनोज जरांगेंनी सरकारला दिला.