Saturday, July 27, 2024
Homeनगरमराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांनी दुसर्‍या टप्प्यातील उपोषण सुरू आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गावागावांत मराठा समाज बांधव एकवटले आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कामरगावचे (ता. नगर) सरपंच तुकाराम कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामरगाव, भोरवाडी ते नगर तहसील कार्यालयपर्यंत मंगळवारी (दि. 31) मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, मंगळवारी सकाळपासून नगर शहरातील आणि उपनगरातील जनजीवनासह व्यवहारावर आंदोलनाचा परिणाम दिसून आला. शहरातील व्यवहार कमी प्रमाणात सुरू होते. तर नगरच्या एमआयडीसी भागातील अनेक दुकाने बंद होती. नागापूर, गजानन कॉलेनी, बोल्हेगाव फाटा या भागाचा यात समावेश होता. बंद, उपोषण, निदर्शने यामुळे नगर शहर आणि उपनगरातील वातावरण ढवळून निघाले. याचा परिणाम अनेक ठिकाणी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. काल सकाळी नगर तालुक्यातील चास, कामरगाव, भोयरे पठार, भोयरे खुर्द, पिंपळगाव वाघा, भोरवाडी येथून सुरूवात झाली.

आरक्षणासाठी पायी 20 किलो मीटर चालत मोर्चा तहसील कार्यालय येथे आला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे कामरगावचे सरपंच कातोरे यांनी सांगितले. या मोर्चात राजू आंबेकर, युवराज कार्ले, बाबा टकले, भास्कर भोर, सुलोचना नाट, संदीप कोल्हे, अक्षय भोर, आकाश ठाणगे, अरुण भोर, राहुल जाधव यांच्यासह मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसील कार्यालयाबाहेर तोफखाना पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे उपस्थित होते. दरम्यान, भोरवाडी येथील योगेश पानसरे या युवकाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वत: रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद घ्यावी, असे पत्रात म्हटले आहे. हे पत्र तहसीलदार यांना देण्यात आले आहे. सायंकाळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांनी आलेल्या वैद्यकीय पथकाला उपचार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

निंबळकमध्ये कडकडीत बंद

मराठा आंदोलनास पाठिंबा, तसेच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी निंबळक येथे काल कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. दरम्यान काल गावात अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होती. जोपर्यत जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमदार, खासदार राजकीय पक्षाच्या नेत्यांना गाव बंदी करण्यात आली असल्याचे सरपंच प्रियंका लामखडे यांनी सांगितले.

संभाजीनगर मार्गावर रास्तारोको

सकल मराठा समाजाने छत्रपती संभाजीनगर मार्गावरील शेंडीबायपास मिरावली पहाड रोड याठिकाणी महामार्गावर मराठा तरूणांनी रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांनी शेंडी चौकात सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. तर नगरच्या तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दुसर्‍या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरू होते. नगर तालुक्यातील इमामपूर, जेऊर व ससेवाडी येथील समाज बांधवांनी नगरला येऊन तहसीलदारांना निवेदन दिले व अन्नत्याग आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या