मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमरण उपोषण करत आहेत. आज (रविवारी) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. काल (शनिवारी) मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डॉक्टरांना (Maratha Reservation) बोलावण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे आज (रविवार) सुट्टीचा दिवस असल्याने राजकीय नेते जरांगेंच्या उपोषणस्थळी जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचे समजते. तसेच आज पुन्हा एकदा शिंदे समितीचे सदस्य मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आणि कुणबी (Maratha and Kunbi) एकच असल्याने आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण हवं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाची नाराजी ओढवण्याची शक्यता असल्याने सरकारची कोंडी झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) नेतेही या आरक्षण प्रश्नावरून कोणती भूमिका घ्यावी, याबाबत संभ्रमात आहे.
आंदोलकांचा सीएसएमटी परिसरात पुन्हा ठिय्या
मुंबई महापालिकेने मराठा आंदोलकांना सुविधा न दिल्यामुळे काल (शनिवार) सकाळपासून सीएसएमटी परिसरात ठिय्या दिला होता. त्यानंतर आज (रविवारी) सकाळी देखील मराठा आंदोलकांनी सीएसएमटी परिसरात एकच गर्दी केली आहे. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी झाली असून, पोलिसांसमोर ही कोंडी सोडण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच मराठा आंदोलकांनी सीएसएमटी परिसरातच सकाळचा नाश्ता केला.





