राहाता |प्रतिनिधी| Rahata
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही. यापुर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समाजाला मिळालेले आरक्षण पुन्हा प्रस्तापित होणे हाच सरकारचा प्रयत्न आहे. आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. परंतू आता समाजातील तरुणांचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. याला समाजाने बळी पडू नये, असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
जालना येथील घटनेबाबत आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, या घटनेचे समर्थन मुळीच नाही. घटनेबाबत सरकारने चौकशीचे सर्व आदेश दिलेले आहेत. दोषींवर निश्चित कारवाई होईल. केवळ आता आरक्षणाच्या प्रश्नावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की, राज्यात मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते. मात्र मागील अडीच वर्षे राज्यात आघाडी सरकार सत्तेवर होते. आरक्षणाच्या मुद्यावर या सरकारने गंभिरतेने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळेच मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण गमवावे लागले हे सुध्दा दुर्लक्षित करुन चालणार नाही.
मागच्या सरकारमुळे गेलेले आरक्षण पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले आहे. समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही सरकारची भूमिका असल्याचे सांगून आरक्षण मिळविण्यासाठी सरकारची भावना अतिशय गंभीर आणि प्रामाणिक आहे. त्यामुळे समाज बांधवांनी शातंता राखण्याचे आवाहन करुन विरोधकांकडून होत असलेल्या बुध्दीभेदाला बळी पडू नये, असेही त्यांनी सुचित केले आहे.