मुंबई | Mumbai
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘गोदावरी’ चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती जितेंद्र जोशीने केली आहे. तसेच दिग्दर्शन निखिल महाजनचे आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी म्हणजेच निशिकांतचे नाशिकमध्ये राहणारे कुटुंब दिसत आहे. या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण दाखवण्यात आले आहे. ‘गोदावरी’ नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे.
गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे, तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात दिसतेय. नदीच तर आहे, असे मानणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल.