मुंबई | Mumbai
मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.
चित्रपटांबाबत सांगायचं तर, प्रदीप पटवर्धन यांनी नवरा माझा नवसाचा, नवरा माझा भवरा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, भुताळलेला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यापैकी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटामध्ये त्यांना खास प्रसिद्धी मिळाली होती. यामध्ये त्यांनी विनोदी खलनायकाची भूमिका साकारली होती.