मुंबई | Mumbai
मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे रविवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या १७ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सर्वस्तरांतून विक्रम गोखले यांना आदरांजली अर्पण केली जात आहे.
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले.त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले.भावपूर्ण श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही. काल परवपर्यंत ते तसे संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असतं.एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचें जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते.पण दुर्दैव. मी या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो.
उद्धव ठाकरे
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला. अभिनय कौशल्य व अनोख्या संवादशैलीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ५० वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करत सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शरद पवार
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व! भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले! अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना! ॐ शांति
देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी, हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान मिळविले. त्यांच्याबद्दल साऱ्यांनाच वाटत असलेली आदरयुक्त भीती हा मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. चित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगाच्या पलीकडेही एक जग आहे आणि त्या जगातील सामान्य माणसांच्या वेदनेशी, जगण्याशी आपण एकरूप व्हायला हवे, हे मूल्य त्यांनी आयुष्यभर जोपासले. या श्रेष्ठ कलावंत, विचारवंताच्या नसण्याची ही उणीव नेहमी जाणवत राहणार आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
चंद्रशेखर बावनकुळे
विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील! जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता कॅमेराला डबल लूक देईल , जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून पानभर संवाद बोलला जाईल जेव्हा जेव्हा घेतलेल्या पाॅज मधूनही अचूक अर्थ पोहोचवला जाईल जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील जेव्हा जेव्हा ‘बिटवीन द लाईन’ संवादापेक्षा अधोरेखित होईल.. भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात निर्भीड भूमिका मांडली जाईल.. तेव्हा तेव्हा विक्रमकाका….. तुमची उणीव भासत राहील!!!
खा. अमोल कोल्हे
अनेक वर्षांपासूनचा संपर्क होता. काल त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची बातमी आली होती. पण आज अचानक ही दुःखद बातमी आल्याने धक्का बसला. त्यांचे सगळे परफॉर्मन्स आम्हाला आठवतात. त्यांनी केवळ मराठी चित्रपटसृष्टीत नाही तर हिंदी इंडस्ट्रीही गाजवली. अग्निपथमध्ये सुंदर भूमिका दिली होती. अमिताभ बच्चन यांनाही त्यांनी टक्कर दिली होती. एक चांगला मित्र, माणूस गेला, त्यामुळे खूप वाईट वाटलं.
महेश कोठारे