Saturday, July 27, 2024
Homeब्लॉगआयुष्य

आयुष्य

प्रत्येकाच्या आयुष्यात कोण कधी येईल आणि आपले अवघे जीवन कसे बदलून जाईल हे सांगता येत नाही. पण ब-याचदा असे घडते. आपणास काही न सांगता किंवा काहीही माहीत नसताना कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं आणि आपले जीवन बदलून जाते.ती व्यक्ती आपली कोणी नसतांनाही आपली होऊन जाते. का होत असं? ज्या व्यक्तीला आपण कधी पाहिलेले नसते, कधी त्या व्यक्तीच्या आपण संपर्कातही नसतो तरीही अशी अज्ञात व्यक्ती आपली बनते. इतरांपेक्षाही आपल्याला ती जास्त हवीहवीशी व जवळची वाटते. कुठल्याही कार्यक्रम असो, काही बोलायचे असो किंवा काही करायचे असो प्रत्येक गोष्टीत आपण त्याला विचारात घेतो. त्याच्या आवडीनिवडी, त्याचे राहणे, किती किती काळजी घेतो.पण हे सगळं वाटणं म्हणजे ती व्यक्ती आपल्यासाठी स्पेशल आहे असं आपण ठरवून टाकलेलं असतं आणि बघता बघता ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनते. त्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो. त्याला जराही दुखावत नाही सगळ्या गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे करतो. खरं तर तसं करायला आपल्याला कोणी सांगत नाही. तरीही जशी मनाची भाषा मनाला कळते आणि डोळ्यांची डोळ्यांना. न सांगताही त्यातले भाव कळत जातात आणि बघता बघता आपण त्या व्यक्तीच्या जवळ येत जातो. त्या व्यक्ती शिवाय राहणं अशक्य होतं जातं.

उठता, बसता, झोपता अगदी २४ तास आपल्या डोक्यात त्याच व्यक्तीचा विचार असतो. त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. आपलंच आपल्याला कळत नाही की काय होत जातं. पण मनोमनी खात्रीने आपण सांगू शकतो की आपण त्या व्यक्तीवर मनापासून अतोनात प्रेम करतो. त्याच्याशिवाय आयुष्यात आपण कुणाचा विचार करत नाही आणि मग जर का आपल्याला त्या व्यक्तीची साथ मिळाली नाही तर मन स्वतःशीच नाराज होतं. पोरक्या मुलाप्रमाणे आपली मनस्थिती होते आणि काहीतरी अगदीच टोकाचा निर्णय घेतला जातो. खरं तर या सर्व गोष्टींवर आत्महत्या हा पर्याय नाही. पण ते सहन न झाल्याने अनेक जण व्यसनाधीन होतात. जीवन सुंदर आहे, छान आहे आणि ते आपण मनापासून आनंदाने जगले पाहिजे. पण असे काही घडले की आपण हाताश निराश होतो जणू काहीआपलं जीवन तिथेच संपलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मग ते प्रेम असो, शिक्षण असो किंवा अन्य काही तेवढ्या एका गोष्टींनं आपलं आयुष्य संपत नाही. तर जगण्याविषयीची उमेद वाढते. आयुष्य हे असं कोड आहे जे रोज थोडं थोडं उलगडत जातं. खरं तर आयुष्य कोणासाठी थांबत नाही. पण आयुष्यात जगण्याची कारण मात्र बदलत जातात. काही लोक तात्पुरते आपल्या आयुष्यात येतात तर काही लोक हे दीर्घकाळ आपल्या सोबत असतात. पण अशीही काही माणसे असतात जी काही क्षणातचं आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात आणि अशीच लोक आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येतात. आनंद व उत्साह ही अशी गोष्ट आहे जी जीवनाकडे आपल्याला सकारात्मकतेने बघायला लावते. जीवना विषयीचा आशावाद वाढवते.

- Advertisement -

जीवनात सतत आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील असे नाही. पण घडत गेल्या की आपण आनंदी होतो आणि नाही घडल्या तर दुःखी होतो. पण जीवन हे सर्वांसाठी सारखंच असतं. फरक इतकाच की कोणी मनापासून, अगदी भरभरून मनासारखं जगतो. तर कोणी दुसऱ्याचे मन जपून जगतो. बऱ्याचदा आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये ही भावना असते. तर कधी दुसऱ्यांचा विचार न करता मनाला हवे तसे जगण्याचा प्रयत्न केला जातो. पण ज्यावेळी आपल्या आयुष्यात कोणी येत मग ती अनोळखी व्यक्ती असेल, कुणाशी मैत्री झाली असेल किंवा ज्या व्यक्तीकडून आपण कसलीच अपेक्षा ठेवली नसेल आणि ती पूर्ण झाली असेल. म्हणून आयुष्यात अशा व्यक्ती खूप आनंद देऊन जातात. त्याचबरोबर या व्यक्तींकडून मिळणारी प्रेरणा ही आपली शक्ती वाढवते. आपल्या मनातील अविचार बाजूला सारून ती आपल्याला सतत प्रेरित करत असते. आपणास गतिशील बनवते. त्यामुळे आपल्याला यश मिळत जाते.आपण यशस्वी होत जातो ते त्यांच्यामुळेच.यशस्वीता ही नेहमी अशा चांगल्या व्यक्तींच्या विचारातून येते. त्यामुळे अशा माणसांचे आयुष्यात येणे म्हणजे आपले पुण्यच म्हणावे लागेल. त्यांच्यामुळे आयुष्याला रंगत येते. आयुष्य जास्त सुंदर वाटायला लागते ज्यावेळी अशी माणसं आपल्या सोबत असतात. आयुष्यात सुख- दुःख येत जात असतात. पण यातूनच आपले कोण, परके कोण कळत जाते. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही पण चांगले मित्र, चांगल्या व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्या की त्या आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.ही माणसं स्वतःला विसरून दुसऱ्यांना आनंद देण्याचा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यक्ती कधी स्वार्थीपणाने वागत नाही. हे जग जरी दुःखाने भरलेले असले तरी चेहऱ्यावरील हसू त्याला दूर करण्याची ताकद ठेवतो. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती आपल्या चेहऱ्यावर आनंद फुलवत जाते. जीवन बदलण्यासाठी आपल्याला मिळालेली ती एक संधी असते. खरे तर प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. पण आपल्याला कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आपण आनंद घेऊन गेले पाहिजे हे त्या व्यक्ती जाणतात. आपल्यासोबत अशी आपली माणसं ठाम उभी राहिली तर वाळवंट सुद्धा हिरवागार होऊ शकतो. त्यामुळे नेहमी हसतमुख व प्रामाणिक राहिले पाहिजे. असं म्हटलं जातं आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते आणि हृदय हारतं पण बुद्धी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरून देखील जिंकलेलं असतं ते यामुळेच.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या