Saturday, July 27, 2024
Homeब्लॉगहक्काचं ठिकाण हवं

हक्काचं ठिकाण हवं

सध्याचे युग हे धावपळीचं युग आहे असं आपण सगळेच म्हणतो. कुणालाच कुणासाठी वेळ नाही. कोणी थांबायला तयार नाही. जो तो फक्त धावत आहे. नोकरी असो की शेती सर्वांचेच काम ठरलेले. पण मित्रांनो या धावपळीतही आपल्याला आपलं मानणार, मनमोकळं बोलता येणारं, दुःख हलकं करणारं असं एक हक्काचं ठिकाण हवं असतं. आज तू फार नाराज दिसतोस काही झालंय का? नाही रे! काय झालं बोल ना! असं जेव्हा आपला मित्र- मैत्रीण, आपले जवळचे, जे आपले हक्काचे आहेत त्यांनी विचारलं की, मनात साचलेल्या सर्व गोष्टी आपण भडभड बोलून मोकळे होतो. हेच ते हक्काचे ठिकाण.

ज्याच्या जवळ काहीही आडपडदा न ठेवता आपण मनातल्या सर्व गोष्टी मनमोकळे पणाने बोलतो.जो समजून घेणारा, मनाला विसावा व उभारी देणारा असतो. ज्या व्यक्तीशी बोलल्याने मन आनंदी होतं, त्याच्याशी सतत बोलावसं वाटतं, त्याची सोबत नेहमीच प्रिय वाटते. अशी हक्काची ठिकाणं आपल्याही जवळ असायला हवीत नाही का? अशा व्यक्ती सोबत झालेला संवाद मनाला आनंद देऊन जातो. त्याच्याशी मारलेल्या गप्पा आठवून आपलंच आपल्याला हसायला येतं आणि हळुवार गालावरून जसा मोरपीस फिरावा तसं आपलं मन होतं. कितीही मन दुःखी असेल पण त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पा आणि खळखळून हसणं झालं की एका क्षणात सर्व दुःख नाहीसं होत. मित्रांसोबत गप्पा करणं असेल, फिरणं असेल, एकमेकांना समजून घेणं असेल, बऱ्याचदा घरच्यांनाही अशा कितीतरी गोष्टी माहीत नसतात त्या आपल्या या हक्काच्या माणसाला माहीत असतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद केला की मन हलक होतं. डोळ्यासमोरून ते सर्व दृश्य तरळून जातात आणि मन सुखावतं.असेच बालपणी भावा-बहिणीं सोबत खेळने असेल, भांडण असेल, अनेक केलेल्या गमती-जमती असतील,एकमेकांना चिडवन असेल पण आता ते प्रसंग आठवले की मनाला आनंद देऊन जातात.अशी हक्काची ठिकाणं मग ती आपले मित्र, मैत्रीण,भाऊ,बहीण,आई,वडील, आजी, बाबा,नातेवाईक असे कोणीही असू शकतं. खरंतर अशी हक्काची ठिकाण ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि असायलाही हवी.जीथे आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असते तिथे नेहमीच प्रेरणा, नवसंजीवनी मिळतअसते.

- Advertisement -

सतत मनाला उभारी देणारी, उत्साह वाढवणारी ही ठिकाणं असतात. त्यांना भेटल्यावर मनात कुठलाही किंतु, परंतु राहत नाही. ज्याप्रमाणे आपण निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातो. तिथे गेल्यानंतर सर्व दुःख विसरून त्या निसर्गाशी, तिथल्या दृश्यांशी आपण एकरूप होतो. ते पाहून मन हलकं होतं. त्या सर्व गोष्टीतून जसा आपल्याला आनंद मिळतो अगदी तसाच आनंद या हक्काच्या ठिकाणातून मिळत असतो. खरंतर प्रत्येक माणसाने व्यक्त होणे गरजेचे आहे. पण बऱ्याचदा आपण मर्यादेत इतके गुंतून जातो की, स्वतः कधी व्यक्त होत नाही. मन मोकळे करत नाही. पण अशी हक्काची ठिकाणं असली की समजून घेतलं जातं, त्याच्या सहवासात मोकळं मोकळं वाटतं. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे जज केलं जात नाही. कशीही परिस्थिती असो त्यावर मात करण्याची उमेद वाढते. कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी असते. त्यामुळे अशी हक्काची ठिकाणं नेहमीच आपल्या आयुष्यात हवी. जी नेहमीच आपल्याला सावली देत असतात. मनाला आराम देण्याची ताकद फक्त त्यांच्यातच असते. काही घडले तरी समजून, प्रत्यक्ष आपले गुण दोष सांगून आपल्याला घडवण्याचा प्रयत्नही केला जातो. शंकांचे निरसन होते.एव्हाना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतात. ही माणसे नेहमी आरशासारखी, स्वच्छ पाण्यासारखी आपले प्रतिबिंब दाखवणारी असतात. त्यामुळेच ती आपल्या विश्वासाला पात्र असतात. म्हणूनच आपण प्रत्येकाने अशी माणसे आयुष्यात जपून ठेवायला हवी.कुठल्याही जडजवाहीरा पेक्षाही मौल्यवान असतात ही माणसं.आयुष्याच्या धावपळीत आणि आपल्या रोजच्याच गडबडीत आपण हे विसरून जातो. बोलणं राहून जातं. पण थोडा वेळ काढून अशी माणसं आपण जपली पाहिजे. त्याचे कारण म्हणजे त्यांची साथ ही आयुष्यात लाखमोलाची असते. त्यांच्यामुळे आपल्याला कधी एकटेपण जाणवत नाही आणि जाणवले तरी ते दूर करण्याची क्षमता त्यांच्यात असते. तुझ्याशी बोलून खूप आनंद मिळतो हे म्हणायला ही विसरू नका.कारण त्यातून मिळालेला आनंद अवर्णनीय आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची आत्महत्या ऐकू येते, पेपर मध्ये वाचली जाते त्या वेळेला मनात येते की मन मोकळं करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी त्याच्याकडे असं कुठलंच हक्काचं ठिकाण नसावं.आयुष्यात ज्या वेळी माणूस खचून जातो,मनाची घुसमट होते, जगण्याची उमेद संपते, माणूस एकाकी होतो त्यावेळी खंबीर पणे पाठीशी असतात ही माणसं.म्हणून आयुष्यात व्यक्त होणं फार गरजेचं असतं. पण माणूस तिथेच व्यक्त होतो जिथे आपल्या हक्काचे ठिकाण आहे.त्याचा आपल्यावर विश्वास आहे. माणूस व्यक्त झाला की तो मोकळा श्वास घेवू शकतो. पण अशी हक्काची ठिकाणं नसली की तो कसा व्यक्त होणार? कसा मोकळा श्वास घेणार? म्हणून आयुष्यात अशी हक्काची माणसं जपावीत आणि आपणही मनापासून खरेखरे कुणाचे हक्काचे ठिकाण व्हावे.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या