पावसाळा सुरू झाला की नवीन ऋतुचक्र सुरू झाले असे आपण मानतो. पाऊस झाला की जमीन ओली होते जमिनीमध्ये पडलेले बी रुजायला सुरवात होते. काही दिवसातच ते अंकुरतं आणि काळी मातीची जागा हिरवीगार हिरवळ घेते. नाजूक गवतांच्या पानांवर रंगीबेरंगी फुलं नाचायला लागतात आणि अशा वातावरणातच लगबग सुरू होते ती वेगवेगळ्या कीटकांची. त्यापैकी काही कीटकांच्या वाट्याला की प्रशंसा येते तर काही कीटकांच्या वाट्याला मात्र फक्त बदनामी येते. बीटल म्हणजेच भुंगा या प्रजातीच्या वाट्याला मात्र कायम अवहेलनाच आली आहे. तोतापुरी आंब्याच्या कोईमध्ये लपल्यापासून तर लाकूड पोखरणारा, झाडांना पोखरणारा, डाळी धान्य कीडवणारा, शेतीतील उभ्या पिकाची नासाडी करणारा म्हणून त्याच्याकडे कायम वाईट नजरेने पाहिले जाते.. त्याचबरोबर त्याच्याकडे दुर्गंधी सोडणारा, अंगावर फोडी आणणारे जैविक रसायन सोडणारा म्हणून तो कायम बदनामीला बळी पडतो आणि ते खरेही आहे. पण सगळेच बीटल मानवास हानिकारक नाहीत. त्याचे अनेक फायदेही आहेत..
पृथ्वी तलावरील बीटल ही कीटकांची एक अतिशय वैविध्यपूर्ण जात आहे. ज्यात जगातील सुमारे ४00,000 ज्ञात प्रजाती आहेत, वर्गीकरण झालेल्या कीटकांपैकी जवळजवळ चाळीस टक्के आणि सर्व माहिती असलेल्या प्राणी प्रजातींपैकी पंचविस टक्के आहे. अजून कितीतरी प्रजाती ओळखणे बाकी आहे. समुद्र आणि ध्रुवीय प्रदेश वगळता जवळजवळ प्रत्येक अधिवासात आढळतात. जमिनीवर बीटलचे अधिवास असंख्य आहेत. त्यात मातीमध्ये, झाडांवर, कुजलेल्या लाकडात, शेणात, डोंगर, दगडाच्य खाली, कोरड्या वाळवंटात तर काही प्रजाती पाण्यातही आढळतात. त्यामुळे ते आपणास नेहमी कोठेरी आढळतातच. ते जवळजवळ सर्व प्रकारचे अन्न खातात, काही परजीवीही आहेत. तर काही शिकारी भक्षक सुद्धा आहेत. बीटल पंखाचे रंग अधिवासाशी मिसळते जुळते असल्याने ते सहजासहजी ओळखू येत नाहीत. काहीतरी वेगळं दिसतं, म्हणून भक्षक त्यांना टाळतात. आणि त्यांचे शत्रूपासून राखण होते. काही बीटल एक पदार्थ स्राव करतात त्याने त्वचेवर फोड येतात. काहींची चव खराब असते त्यामुळे त्यांना खाणे टाळले जाते. अश्या प्रकारे ते स्वताचे रक्षण करतात. बीटल मोठ्या प्रमाणात शेतातील पिके, फळबागा, व बागांमधील झाडांचे पाने, मुळे, देठ, बिया आणि फळे खाऊन पिकांचे नुकसान करतात. शेतमालात बटात्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. जंगलामधील झाडांना बीटल्सच्या अळ्या बोगदे बनवतातत्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून किवा संपूर्ण झाड मोडून मोठे नुकसान होते.आंब्याच्या झाडाला पोखरणारी आली मोठे नुकसान करते. असे असले तरी काही बीटल मानवांसाठी अनेक प्रकारे मदत करणारे पण आहेत. ते प्रमुख विघटन करणारे आहेत. जंगलात ते भक्षक म्हणून ते समस्या असलेल्या कीटकांची, विशेषत: सुरवंटांची संख्या कमी करतात. लेडीबर्ड बीटल हे ऍफिड्सचे महत्त्वाचे शिकारी म्हणून ओळखले जातात आणि या उद्देशासाठी व्यावसायिकरित्या खरेदी केले जाऊ शकतात.
बीटलला मानवी संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. फॉरेन्सिक विज्ञानामध्ये गुन्ह्याचा शोध लावण्याच्या कमी काही बीटल महत्वाची भूमिका बजावतात. बीटल चमकदार आणि आकर्षक रंगामुळे ते सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरतात. काही प्रजाती अन्न म्हणून वापरल्या जातात, बहुतेक बीटल आर्थिक नुकसान करत नाहीत आणि अनेक, जसे की लेडी बीटल आणि शेण बीटल कीटक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. बीटल मानवांसाठी अनेक प्रकारे मूल्यवान आहेत. संशोधकाच्या नजरेतून पाहिले तर पर्यावरणाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी बीटल हा एक आशेचा किरण ठरू शकतो. सध्या मजुरांच्या कमतरतेमुळे शेतामध्ये तणनाशकाचा सर्रास उपयोग केला जातो त्यामुळे पिकांमधील तण कमी होते. पण त्याचा जमिनीतील जैवविविधतेवर खूप विपरीत परिणाम होतो. त्याला पर्याय म्हणून कीटकांचा उपयोग करता येऊ शकतो कारण काही बीटेल्स हे फक्त गवताचे परागकण खातात आणि त्यामुळे त्या गवतामध्ये बीजे निर्मिती होत नाही पर्यायाने तणावर आळा बसण्यासाठी असे परागकण खाणारे बीटल भविष्यामध्ये उपयोगी ठरू शकते. सध्याचा शेती व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कीटकनाशकांचा सर्रास वापर. वेगवेगळ्या कीटकांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी आता कीटकनाशकांचा सर्रास वापर केला जातो त्याचा दुष्परिणाम हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण आणि जमिनीचे प्रदूषण. कदाचित या वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक द्रव्याच्या फवारणीमुळे माणसाच्या आरोग्याचे खूप मोठा धोका निर्माण झाला. काही बीटल वेगवेगळ्या प्रकारच्या इतर कीटकांचा खाण्यासाठी वापर करतात, जसे की लेडी बीटल हा पिकावरील मावा खातो पुढे भविष्यामध्ये या कीटकांचा उपयोग बायलॉजिकल पेस्ट कंट्रोल म्हणून करता येऊ शकतो. उद्देशासाठी व्यावसायिकरित्या खरेदी केले जाऊ शकतात.
– प्रा.डॉ.लक्ष्मण घायवट
(लेखक बी.एस.टी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)