Monday, June 24, 2024
Homeब्लॉगसमानता फक्त बोलण्यासाठी

समानता फक्त बोलण्यासाठी

महात्मा फुले, डॉ.आंबेडकर यांनी स्त्री पुरुष समान मानले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण स्वीकारलेल्या राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिक ते पुरुष किंवा स्त्री असो पूर्णतः कायद्यासमोर समान आहेत हे मानले. हे माहीत असतांनाही आजही समाजात स्त्री- पुरुष समानता मानली जात नाही. जे आहे ते फक्त कागदावर बोलण्या इतके किंवा भाषणात बोलण्या पुरते. पण प्रत्यक्षात अनुभव मात्र वेगळा येतो. आजही बऱ्याच कुटुंबात स्त्री- पुरुष यांत भेदभाव केला जातो. आजही घरातील निर्णय प्रक्रियेत स्त्रियांना सामावून घेतले जात नाही. घरात राब-राब राबूनही तिला दुय्यम स्थान मिळते. स्त्री आयुष्यभर आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी खपते पण घरातीलच मानसे तिचं कधी मन जाणून घेत नाही. एक माणूस म्हणून तिचा विचार करत नाही. तिला कायम गृहीत धरले जाते.गेल्या दीडशे वर्षांपासून राजाराम मोहन राय, महात्मा फुले, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, आगरकर, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर विचारवंतांनी समाजमन बदलण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज विविध क्षेत्रात स्त्रियाही आपली कर्तबगारी दाखवत आहेत.

- Advertisement -

आज राष्ट्रपती, पंतप्रधान पदापासून तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने उत्तुंग भरारी घेतली आहे. पण तरीही स्त्री-पुरुष समानता अजूनही म्हणावी तशी रुजली नाही. आज स्त्री कमावती झाली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागली. नोकरी सोबतच घरातील सर्व काम ती करते. तरी ही घरातील महत्त्वाचे काही निर्णय असतील तर ते पुरुषाकडूनच घेतले जातात. आजही ग्रामीण भागात स्त्री फक्त काम आणि कामच करते. तिच्या स्वतःच्या काही इच्छा आहे, तिला काही करावं वाटतं हे विचारात घेतले जात नाही. आजही ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जात नाही. उच्च शिक्षणासाठी तिचा विचार केला जात नाही. मुलगी म्हणजे परक्याचे धन हाच विचार अजूनही बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. काळ बदलला आपणही बदलत चाललो पण अजूनही काही गोष्टींचा पगडा आपल्यावर इतका आहे की, बदलू म्हटलं तरी बदललं जात नाही. पुणे, मुंबई सारख्या शहरी भागात तरी आज बराच बदल झालेला दिसून येतो. आपल्या देशातील माणसे मग ती स्त्री असो वा पुरुष ही अनमोल अशी संपत्ती आहे आणि प्रत्येकाला आपल्या विकासाची समान संधी आहे म्हणूनच सर्वांनी स्त्री पुरुष समानता हे मूल्य विकसित केले पाहिजे. समाजात राहतांना आपला नेहमी दुसऱ्याशी संबंध येतो. त्यामुळे आपण जे काही करतो आहे त्याचे भान ठेवून काम केले पाहिजे. त्याप्रमाणे आपण आपले मित्र, सहकारी यांमधील स्नेहभाव जपतो त्याचप्रमाणे स्त्री- पुरुष समानता जपली पाहिजे. वागतांना समजूतदारपणा, समंजसपणा आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होण्याची गरज आहे. त्यात कृत्रिमता नको. एक मानव म्हणून आपण स्त्रीचा विचार केला पाहिजे.

समाजात परंपरागत धोरणे, पुरुषी वर्चस्व आजही दिसून येते.ब-याचदा स्त्री पुढे गेलेली पुरुषांना चालत नाही. मग ते घरातील असले तरीही.तिचे वर्चस्व नको असते. समानता म्हणजे स्पर्धात्मक बरोबरी नाही तर सर्व गोष्टीत स्त्रीचा सहभाग असणे होय. स्त्रियांच्या कर्तुत्वावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. मूल्य, संस्कार मुलांमध्ये रुजवणे महत्त्वाचे आहे. फक्त शाळेत मूल्य रुजवले गेले पाहिजे असे नाही तर ते समाजातही रुजले पाहिजे. स्त्री पुरुष भेद नष्ट करण्यासाठी पालकांचे प्रबोधन केले पाहिजे. सर्व क्षेत्रातील जबाबदारी या दोघांनीही मिळून पार पाडल्या पाहिजेत. संसारात पुरुषा इतकाच स्त्रीला मान दिला जातो का? हा महत्त्वाचा प्रश्न. जुन्या काळात पुरुष कमावणारा व स्त्री घर सांभाळणारी असल्यामुळे कामाची त्याप्रमाणे विभागणी झाली व घर सांभाळणारी स्त्री तिला काही ज्ञान नसते, तिला काही कळत नाही असा शिक्का तिच्यावर मारला गेला व ती पायाची दासी झाली. आजही बरेच वक्ते बरेच मान्यवर आपल्या भाषणातून स्त्री चा उदो उदो करतात. पण बोटावर मोजण्या इतकेच लोक याला महत्व देतात बाकी प्रत्यक्षात मात्र तसं कुठेही आचरण करतांना दिसत नाही. आज विविध क्षेत्रात स्त्रीने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पुरुषांच्या बरोबरीने ती काम करते तरी तिला दुय्यम स्थान दिले जाते. म्हणून स्त्रीला कमी न लेखता तिला उभारी दिली पाहिजे. स्त्री व पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत आणि ती सारखी राहिली तरच रथ योग्य दिशेने जाईल. म्हणून आपण सुद्धा मुलगी, सून, पत्नी, आई यांचा सन्मान केला पाहिजे.त्यांना योग्य तो मान दिला पाहिजे. फक्त स्त्री-पुरुष समानता कागदावर किंवा बोलण्यातून नको तर ती प्रत्यक्षात आपल्या घराघरातून दिसून आली पाहिजे.

स्त्री

स्त्रियांनाही मन असतं

त्यांनाही असतात भावना

नसतात त्या शोभेच्या

सुंदर निकामी बाहुल्या

स्त्रियांनाही वाटतं लढावं

सन्मानाने पुढे जावं

घरातून,बाहेरून अन्याय

मग त्यांनी कुठे जावं

स्त्री माता,भगिनी,पत्नी

ओळख तिची नात्यातून

स्वःकर्तुत्वाने घडू द्या

वाढेल शान कुटुंबाची

स्त्री झाली अधिकारी

झुगारू नका तिची सत्ता

देश घडवला स्त्रीयांनीच

तसाच घडेल गाव आपला

स्त्री शिकली कुटुंब शिकते

चांगल्या वाईटाची जाणीव होते

करून सर्वांना साक्षर ती

कुटुंबाला पुढे नेते।।

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या