अनेक संस्कृतींमध्ये माणूस आणि निसर्ग एकमेकांशी जोडलेले आहेत. मॅन्टिसेस ह्या किटकाचे पुढचे दोन हात जोडल्या सारखे दिसतात. त्याच्या ह्या प्रार्थना करण्याच्या मुद्रेमुळे त्याला प्रार्थना किडा असे म्हणतात. आफ्रिकेतील स्थानिक लोकांच्या विश्वासांनुसार हा कीटक नशीब उजळण्यासाठी प्रार्थना करतो. त्यामुळे मॅन्टिसला आफ्रिकेत आदर दिला जातो. काही भागामध्ये निर्भयपणाचे प्रतिनिधित्व करणारा असे मानले जाते. पाचव्या शतकातील चांदीच्या नाण्यांवर मॅन्टिसचे चित्र आढळते. चीनमध्ये स्वतंत्रपणे विकसित केलेल्या दोन मार्शल आर्ट्समध्ये मॅन्टिसेस आधारावर हालचाली आणि लढाईची रणनीति आहे असे म्हणतात.
मॅन्टिसेस हे जगभरातील अनेक प्रदेशांमध्ये आढळतात. जगभरात त्यांच्या २४०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. उत्तर अमेरिकेत, कॅनडा, युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकोसह संपूर्ण खंडात प्रार्थना करणारे मॅन्टिस आढळतात. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये त्याच्या अनेक प्रजाती आढळतात. हा कीटक जंगले, गवताळ प्रदेश, वाळवंट आणि शेतामधील विविध पिके अश्या विविध प्रकारच्या अधिवासांमध्ये अढळतो.
रंगाने बहुदा हिरवा आणि नेहमी आक्रमक वाटणारा हा किडा आपल्या भागातही अढळतो. त्याची मान लवचिक मानेवर फुगलेले डोळे असलेले त्यांचे डोके त्रिकोणी असते. ते लवचिक मानेने धाडला जोडलेले असते. डोक्यावर दोन फुगलेले डोळे असतात त्याच्या साह्याने ते शिकार शोधतात. पुढचे पाय प्रमाणात वाढलेले असतात आणि शिकार पकडण्यासाठी आकाराने अनुकूल असतात. शिकार जवळ येण्याची वाट पाहत असतात किंवा मंद, चोरट्या हालचालींनी शिकार करतात. आणि वेळ आली तर हवेत उडू पण शकतात. जेव्हा थेट धोका असतो, तेव्हा अनेक मॅन्टिस प्रजाती उंच उभ्या राहतात आणि त्यांचे पुढचे पाय पसरतात आणि त्यावेळी त्यांचे पंख पसरलेले असतात. पंखांच्या हालचालीमुळे मँटिस अधिक मोठे आणि अधिक धोकादायक दिसतात, मँटिसला त्रास पुढच्या पायाने प्रहार करू शकतो आणि चावण्याचा प्रयत्न करू शकतो.
त्यांचा प्रजनन काळ उन्हाळ्यात असतो. एक मादी जातीनुसार १० ते ४०० अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या पिलास प्रौढ अवस्थेपर्यंत पोहोचण्यापूर्वी ५ ते १० वेळा मोल्टिंग करावे लागते. हे कीटक ४ ते ५ आठवडे जगू शकतात. नैसर्गिकरित्या वाढणारी इतर कीटकांची संख्या मर्यादेत ठेवण्यासठी हे महत्वाची भूमिका बजावतात. त्यात बहुतेक वेळा पिकांचे नुकसान करणारे कीटक असतात. मँटिड हा मांसाहारी कीटक आहेत तो छोटे मोठे कीटक आणि इतर लहान प्राणी सुद्धा खातो. काही प्रजाती तर बेडूक, सरडे आणि अगदी लहान पक्षी खातात. जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रेइंग मॅन्टिड्स सूचक असल्याचे सिद्ध झाले आहे.
– डॉ. लक्ष्मन घायवट
(प्राणिशास्त्र विभाग, एस.एम.बी.एस. टी.कॉलेज, संगमनेर)