Monday, May 27, 2024
Homeब्लॉगलग्नासाठी मुलांना मिळेना मुली

लग्नासाठी मुलांना मिळेना मुली

गेल्या काही वर्षात मुलींची संख्या प्रचंड प्रमाणात घटली. त्यामुळे प्रत्येक पालकांच्या, मुलींच्या अपेक्षा वाढत गेल्या. पालक आपल्या मुलीसाठी चांगल्यातील चांगले स्थळ शोधू लागले. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांचे लग्न होणे खूप अवघड झाले आहे. या समस्येमुळे गावातील लोक त्रस्त झाले आहे. जवळ- जवळ ३० ते ३५ वर्षे वय झाले पण मुलांचे लग्न होत नाही. लग्न करताना मुलगा आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहे, घरदार, नोकरी, शेती या सर्व गोष्टींची चाचपणी केली जाते. विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी मुलींना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. घरचे लोक जे निर्णय घेतील तो मान्य करावा लागत होता. मुलींना बोलण्याची संधी नव्हती. पण आता काळ बदलला.

मुली ही मुलां बरोबरीने शिकू लागल्या, नोकरी करू लागल्या. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ही त्यांना मिळाले. त्यामुळे आता मुलीही सक्षम झाल्या. त्याही चुल- मूल रूढी, परंपरा झुगारून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्यांच्याही अपेक्षा वाढत गेल्या. लग्न करण्याचा निर्णयही त्या घेऊ लागल्या आहेत आणि त्याला पालकांची ही संमती आहे. विशेष म्हणजे शेतकरी नवरा कुणालाच नकोय. सर्वांना मोठे पॅकेज, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी आणि एकुलता एक मुलगा असेल तर अजून भारी. मोठी फॅमिली नको अशा दृष्टीने विचार बदलले. महत्त्वाचे म्हणजे जे लोक शेतकरी आहेत त्यांनीही आपल्या मुलीसाठी मुलगी शिकलेली नसेल तरीही नोकरदार नवरा हवा हा अट्टाहास केला. त्यामुळे शेतकऱ्यांनीच शेतीला दुय्यम दर्जा दिल्यामुळे ही मुलांना मुली मिळेनाशा झाल्या. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुलींच्या कुटुंबीयांना पैसे देऊनही लग्न करण्याची पद्धत सुरू झाली. त्याच बरोबर काही ठिकाणी अनाथ आश्रमातील मुलींशीही लग्न लावले गेले. तेही योग्य अटींची पूर्तता करूनच. त्याचबरोबर बरेच तरुण आज बेरोजगार आहेत. काहींनी एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करूनही हाती काही लागले नाही. पाच- सहा वर्ष त्यांचे वाया गेले. वय झाले त्यामुळे हीच तरुण मुले खेडेगावात येऊन छोटा मोठा व्यवसाय करायला लागले. पण लोकांनी त्यांनाही मुली देणे पसंत केले नाही.

- Advertisement -

खरंतर खेड्यापाड्यात मुली द्यायलाच लोक तयार होत नाही हा महत्वाचा प्रश्न.त्यामुळे मुलांचे लग्नाचे वय ३०ते ३५ च्या आसपास झाले आहे. उशिरा लग्न झाले तर त्याचा परिणामही भविष्यावर होऊ पाहत आहे. काहींना शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वीच्या काळी वीस-बावीसाव्या वर्षापर्यंत मुलांचे लग्न व्हायचे पण आता मुली मिळत नाही म्हणून मुलांचे खच्चीकरण होत आहे. तर काही कुटुंबांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. खेड्यात बरेच कुटुंब हे शेतकरी आहेत. शेती व्यवसाय हा नेहमीच तोट्यात चालतो, मुलीला आयुष्यभर खूप कष्ट करावे लागतात असा लोकांचा समज झाला आहे. त्यातही नोकरी नसल्यामुळे या तरुणांचे टोळके गावात फिरताना दिसत आहे. त्यामुळे अशा मुलांना मुली कोण देणार असा प्रश्न पडला आहे. मागच्या काही वर्षांमध्ये समाज व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात बदलत गेली. आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य संस्कृतीमुळे खूप बदल झाला. याचा परिणाम समाज जीवनावरही झाला. लोकांची पूर्ण मानसिकता बदलली.

साधारणता २०२० सालापासून भारतात तंत्रज्ञानाचे युग हे गाव, खेड्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे ही लोकांच्या जगण्याचा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पाश्चिमात्य संस्कृतीचे आगमन झाल्यामुळे लोक त्याचे अनुकरण करू लागले. या बदलामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या. विशेष म्हणजे आता शहरी भागामध्ये ही समस्या दिसू लागली आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या नोव्हेंबरमधील अहवालानुसार भारतात दर एक हजार पुरुषामागे एक हजार वीस महिला आहेत. लिंग गुणोत्तराची ही स्थिती असूनही मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. हे भयानक वास्तव आज खेडोपाडी दिसत आहे. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. फक्त शेतकरीच मुलाला मुलगी मिळत नाही असे नाही तर शिकलेल्या मुलालाही मुलगी मिळेनाशी झाले आहे. त्यामुळे काही तरुण आत्महत्येकडे ही वळलेले आहे.सध्या तरी काही प्रमाणात लोक आंतरजातीय विवाह करत आहे. पण अशी परिस्थिती राहिली तर लोक काय करतील हे सांगायला नको. त्यामुळे आपण सर्वांनी आपली विचारसरणी मुला-मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य ठेवली पाहिजे.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या