भारतीय समाजात मेहंदीला खूपच मानाचे स्थान आहे. मेहंदी तळहातावरील फक्त नक्षी नसते तर ,ती शृंगाराच्या साखळीचा एक दुवा असते. मेहंदी शकून भरल्या हातांचा सात्विक शृंगार असतो. ज्यात स्त्री मनाच्या तरल भावना गुंफलेल्या असतात. मेहंदी मुळे स्त्री चे सौंदर्य अजून खुलते. मेहंदीचा हिरवट रंग जाऊन त्याला एक लालीमा येते. कुठल्याही सण, समारंभ, लग्न समारंभ अशा शुभ कार्यासाठी मेहंदी हमखास लावली जाते. मेहंदी लावण्याची परंपरा तशी फार पूर्वीपासून आहे. आधीपासूनच स्त्रिया मेहंदी लावत. पण काळ बदलला तसतशी मेहंदीच्या पद्धतीतही बदल झाला. आज अनेक डिझाईन मध्ये मेहंदी लावली जाते. आपली मेहंदी उठून, अगदी खुलून दिसावी ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. भरलेली मेहंदी ही विवाहित महिलांना अधिक चांगली दिसते. ज्यांना वेळ आहे ते हातावर पूर्ण भरलेली मेहंदी लावतात. मेहंदी मुळे हाताचे सौंदर्य वाढते. त्याचबरोबर सध्या अरेबिक मेहंदी ही सर्वाधिक काढली जाते.
मेहंदीत आपण कुठलीही नावे, चित्र काढू शकतो. मेहंदी सकारात्मक आत्म्याचे आणि नशीबाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते. हिंदू, मुस्लिम स्त्रिया लग्नाच्या वेळी शरीरावर मेहंदी लावतात. हिंदू स्त्रिया करवाचौथ, वटपौर्णिमा, दिवाळी, भाईदुज, नवरात्री, दुर्गापुजा आणि तीज या सणांमध्ये मेहंदी लावतात. तर मुस्लिम स्त्रिया ईद-उल-फित्र आणि ईद-उल अदा सारख्या प्रसंगी मेहंदी लावतात. पण आता कुठल्याही आनंदी मेळाव्यात मेहंदी ही लावली जाते. मेहंदीचा रंग जितका गडद होत जाईल तितके त्या दोन व्यक्तींमधील प्रेम अधिक खोलवर जाईल असे मानले जाते. आज कुठल्याही समाजात मेहंदी आवडीने लावली जाते.मेहंदी हा एक कलाप्रकार ही आहे. मेहंदी वापराचे सर्वात जुने दस्तऐवज प्राचीन भारतीय ग्रंथ आणि प्रतिमांमध्येही आपल्याला आढळून येतात. मेहंदी पॅटर्न हा बॉडी आर्टचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये मेहंदीच्या रूपा पासून बनवलेल्या पेस्टचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या त्वचेवर विशेषतः त्याच्या हातापायावर क्लिष्ट डिझाईन काढली जाते. जवळजवळ लग्नाच्या अगोदर ‘मेहंदी’ हा उत्सवही आता साजरा केला जातो.तसेच हिंदू आणि शीख संस्कृतीत ‘मेहंदी पार्टी’ हा उत्सव लग्नाच्या अगोदर केला जातो. ज्यात वधूला लाल, केसरी मेहंदी डाग तिच्या तळहातावर, हाताच्या मागील बाजूस आणि पायांवर लावला जातो.
आता कुठल्याही लग्न समारंभात मेंदीची रस्म एक दिवस अगोदर केली जाते. अतिशय थाटामाटात नवरीच्या हातावर ही मेहंदी काढली जाते. नवरीच्या हातावर खुलणारी मेहंदी रंगली की किती आनंद होतो. कारण मेहंदी रंगली की होणारा पती तिच्यावर खूप प्रेम करेल असे समजले जाते. भावी आयुष्याची स्वप्न पहात त्या मेहंदीत ती स्वतःला हरवून जाते. मेंदी भरल्या बोटांनीच केसांच्या बटा सावरण्याचा प्रयत्न करते. आपल्या सख्याच्या स्वप्नात ती हरवून जाते. पहिल्या स्पर्शाची पहिली साक्षीदार मेहंदीच असते. सख्याचा स्पर्श हवाहवासा वाटत असतांनाही त्याच्या मिठीतून सोडवून घेण्याची धडपड ही या मेहंदी भरल्या हातांचीच असते. जेव्हा त्याचा स्पर्श होतो तिच्यासहित तीही शहारते,मोहरते,उमलते. नकळत जसं कळी फुल व्हायला आतुरलेली. तो घट्ट मिठीत घेतांना त्याला स्पर्शते ती मेहंदीभरले बोटेच. त्याच्या अंगाला स्पर्श करत ती कधी त्याची होते याचं तिलाही भान नसतं. त्याच्या हातात हात जाताच एकरूप होतात हे मेहंदी भरलेले हात आणि आयुष्यभराची साथ देण्याचं देतात वचन. मेहंदी लावणे हे प्रत्येक मुलीला, स्त्रीला खूप आवडतं. मेहंदीचा सुगंध मनाला वेड लावून जातो. तिचा लाल भडक किंवा काळा कुळकुळीत रंग मनाला खूप आनंद देतो. मेहंदी ही सख्याच्या काळजाचा ठाव घेते.मेहंदी हा एक हस्तकला व्यवसायही आता झाला आहे. मेहंदी हा शरीर कलेचा एक प्राचीन प्रकार आहे. ज्याचा उगम भारतात आणि संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्यपूर्व मध्ये झालेला दिसून येतो म्हणून आयुष्यात पानांचा कचरा न बनता मेहंदीच्या पानासारखे बनले पाहिजे. जी स्वतःला कुस्करून दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरते. स्वतःचं समर्पन करून दुसऱ्याचे जीवन आनंदी करते.
_मलेका शेख- सैय्यद
(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)