Monday, November 25, 2024
Homeब्लॉगमाझे काय चुकले...

माझे काय चुकले…

बरेच दिवसांपूर्वी मोबाईलला व्हाट्सअॅप वर एक लेख पाहिला त्याचे शीर्षक होते ‘माझे काय चुकले’.शीर्षक वाचल्यानंतरच तो लेख वाचावा असे मनाला वाटले आणि तो संपूर्ण लेख मी वाचून काढला. खरं तर तो लेख नव्हता ते होते एका बापाचे मनोगत. वाचता वाचता मन हेलावले. बापाचे मन आणि त्याची होणारी तगमग, त्याची होणारी अस्वस्थता दिसली आणि मी स्वतःशीच विचार करू लागले. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना हाताचा पाळणा करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात, त्यांची काळजी घेत असतात. ज्या वयात त्यांना काहीच कळत नाही त्या वयात त्यांचा सांभाळ करून, योग्य मार्गदर्शन करून त्यांना घडवतात. त्यांनी खूप शिकावं मोठं व्हावं, त्यांचं भविष्य उज्वल व्हावं अशी अपेक्षा धरतात व त्यासाठी ते अहोरात्र कष्ट करत असतात.

आपल्या मुलांसाठी ते सतत धडपड करतांना दिसतात. आपल्याला जे मिळाले नाही ते मुलाला देण्याचा प्रयत्न करतात. पण आता काळ बदलला तसे सर्वच बदलत चालले. आज आई-वडील दोघेही नोकरी करतात. मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरे आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच मुले एकाकी, एकलकोंडे, हट्टी झाल्याचेही दिसून येते. पण येथे पालक म्हणून वडिलांनी मुलाला काहीच कमी पडू दिले नाही. एकुलता एक मुलगा घरात खूप लाडात वाढलेला. मुलाने शिकावे, खूप मोठे होऊन नाव कमवावे असे त्यांना सतत वाटत असे. त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही मुलाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टाकले. दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आणि पुढील शिक्षणासाठी चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये त्याचे ऍडमिशन घेतले. मुलाला जे-जे हवं ते-ते सर्व देण्याचा प्रयत्न केला. पण मुलाला शिक्षणात गोडी वाटेना त्याचे अभ्यासात लक्ष लागेना. आता कॉलेजचे लेक्चर कमी आणि उनाडक्या करणाऱ्या मुलांबरोबर फिरणे वाढू लागले. सोबतच दारू पिणे, सिगारेट ओढणे हे व्यसन ही लागले. वडील वेळ काढून जेव्हा त्याला भेटायला जायचे तेव्हा तो कॉलेजमध्ये नसायचा. सुरुवातीला काहीतरी कारण सांगून रेटून गेले. पण वडिलांना शंका आली आणि ते पंधरा दिवसातून मुलाला भेटायला जाऊ लागले. पण आता ते त्याला बाहेर न भेटता कॉलेजला गेले, प्राचार्यांना भेटले, शिक्षकांना भेटले. त्यातून मुलगा काय करतो हे कळाले. त्याचा वाह्यातपणा त्यांच्यासमोर आला.

- Advertisement -

आनंदी जीवन जगता आले पाहिजे…

वडिलांनी प्राचार्यांची परवानगी घेऊन मुलाला घरी आणले. काही दिवसात तो सुधारेल,पुन्हा कॉलेजला जाईल अशी त्यांना खात्री होती. घरी आल्यानंतर आईने व वडिलांनी त्याची खूप समज घातली. त्याला व्यसन सोडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू लागले. व्यसनमुक्ती केंद्र किंवा इतर बाबा, भगत जे काही लोक सांगतील ते-ते सगळे त्यांनी केले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता तर कॉलेजला जायलाही त्याला आवडेना. त्याला दारू पिण्याची इतकी सवय लागली होती की त्याशिवाय तो राहू शकत नव्हता. वडील कामाला गेले की तो घरातून बाहेर पडायचा. आईचेही ऐकायचा नाही. घरात बसून कंटाळा येतो, थोडं बाहेर जाऊन येतो म्हणायचा. पण थोडं-थोडं करता करता आता अर्धी रात्र उलटून जायची. आई वडील घरी वाट बघत बसायचे. आणि तो आला की नशेत चुर असायचा. काय करावं हे आई-बाबांना देखील कळेना. त्यांनी जवळचे काही नातेवाईक, त्याचे चांगले मित्र यांना समज घालायला सांगितली. सर्वांनी त्याची समजही घातली. पण त्याचाही उपयोग झाला नाही. आता आई-वडिलांचे मनही कशात लागत नव्हते.उठसुट फक्त मुलाची चिंता. सगळे प्रयत्न करून झाले तरी तो सुधारत नव्हता. मुलापुढे आई वडील हतबल झाले होते. मुलासमोर त्यांनी हात टेकले होते. ज्या काळजाच्या तुकड्यासाठी त्यांनी मोठमोठी स्वप्न पाहिली ती आता डोळ्यासमोर नष्ट होत होती. आई-बापाचे काळीज तिळतिळ तुटत होते. आता तर तो कुणाचीही मर्यादा धरत नव्हता. काही बोलायला गेले की उर्मटपणे फिरून बोलायचा. पण त्याला त्याचे काही वाटत नव्हते.

‘दोस्तो’ कवितेचा जन्म

जेव्हा सकाळी तो चांगला राहायचा तेव्हा त्याला आई खूप समजून सांगायची पण त्याचा त्याला काही फरक पडायचा नाही. आता तर त्याचं बाहेर राहणं वाढलं होतं. मित्रांमध्ये टवाळक्या करणे, गुंडागिरी करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले. पिण्याचे प्रमाण वाढले. काय करावं, काय निर्णय घ्यावा आई-वडिलांना समजेना. रोजचा उगवणारा नवा दिवस काहीतरी चांगलं घेऊन येईल या आशेने ते बघायचे. पण त्यांची अशा पूर्ण धुळीला मिळाली. मित्रांच्या संगतीत तो पूर्णपणे वाया गेला होता. एक दिवस तो घरातून गेला पण परत आलाच नाही. रात्रभर आई-वडील त्याचा शोध घेत होते. पण कुठेच त्याचा तपास लागला नव्हता. शंकाकुशंकांनी त्यांचं मन घेरलं होतं. नको ते विचार मनात डोकावून जात होते आणि या विचारानेच ते अर्धमेले झाले होते. तेवढ्यात त्यांना निरोप आला की एका ठिकाणी एका मुलाचा मृतदेह मिळाला आहे तुम्ही जाऊन बघून या. आईने तर हंबरडा फोडला. कसंतरी काळजावर दगड ठेवून वडील बघायला गेले. तेव्हा मुलाचं मर्डर झालं, त्याला कोणीतरी मारून टाकलं असे शब्द त्यांना ऐकायला मिळत होते. त्यांचा विश्वास बसेना, जीव टांगणीला लागला होता. पण जेव्हा प्रत्यक्ष त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना तर धक्काच बसला. काळीजाचे तुकडे झाल्यासारखे वाटू लागले.अश्रू आवरेनासे झाले आणि ते तिथेच कोसळले. वाईट संगतीचा परिणाम वाईटच झाला. कोण म्हणे मित्रांमध्येच भांडणे झाली आणि त्याला चाकूनी भोसकले. खरे काय नी खोटे काय नंतर उलगडेल. पण आज एक बाप मुलापुढे हरला होता. त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले होते. खरंतर यात त्यांचं काही चुकलं नव्हतं. कोणतेही आई-वडील आपल्या मुलांचं वाईट व्हावं असा कधी विचार करत नाही. उलट मुलं आनंदात राहावी यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण एकदा का मार्ग चुकला की पश्चातापशिवाय काही उरत नाही. मार्ग वाईट निवडला तर शेवट ही वाईटच होतो. त्यामुळे आज आपल्या सर्व माता-पित्यांना हा विचार करण्याची वेळ आली आहे. आज शिक्षणाच्या निमित्ताने बरेच मुलं- मुली बाहेर आहेत. पण आपण स्वतःहून आता त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज रिलेशनशिपमध्ये जे काही घडते आहे तेही आपल्यासमोर आहे आणि याबाबत दोष कुणाला द्यायचा. म्हणून प्रत्येक कुटुंबात मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. मुलांच्या अंगी सहनशीलता, सोशिकता येणे गरजेचे आहे. एकमेकांना समजून घेण्याची पात्रता निर्माण होणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून कोणत्याही पित्यावर ‘माझे काय चुकले’असे म्हणण्याची वेळ येणार नाही.

मैत्री

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या