सहसा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाचे आगमन होते. पण आता दोन महिने उलटून गेले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि तो अजूनच चिंताग्रस्त दिसू लागला आहे. लेकराबाळांच्या तोंडातला घास काढून जे घरात होते ते शेतात टाकून तो मोकळा झाला आहे. थोड्याफार पावसावर आलेली पिके आता माना टाकायला लागली आहे. काही ठिकाणी तर पिके करपली आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पण पाणीच नसेल तर कसली पेरणी! आता तर त्याचीही शक्यता धुसरं झाली आहे. जनावरांचे दुःख देखवत नाही. त्यांनाही मुबलक चारा, पाणी नाही. अशी स्थिती राहिली तर काय करावं? कुठे जावं? काय खावं? भविष्य हे अंधकारमय दिसू लागते.सर्व जगाला पोसणारा बळीराजा पाऊस न पडल्याने मोठ्या विवंचनेत सापडतो. त्यामुळे काय करावं आणि काय नाही असा शेतकऱ्याच्या मनात गोंधळ निर्माण होतो. आकाशात ढग येतात पण पाऊस पडत नाही. पाऊस येण्याच्या आशेनं आकाशाकडे टक लावून तो केविलवाण्या नजरेने पाहत असतो.
खरीप तर हातचा गेला पण रब्बीचं ही काय सांगावं. त्याच्या तोंडचं पाणी पळालं आहे. पाऊस वेळेवर पडला तर किमान शेतकऱ्याची चिंता मिटते. शेतात कोणते पीक घ्यावे यावर विचार होतो. उत्साहाने तो कामाला लागतो.बळीराजाला दिलासा मिळतो. पण पावसाने विलंब केला की बळीराजाचं सगळं गणित बिघडतं. आता तरी पाऊस येईल या आशेनं तो काळेभोर शेत नांगरून वखरून तयार ठेवतो. शेत हिरवेगार अन पिक वा-यावर डोलू लागलं की त्याचं ऊर आनंदाने भरून येतं. मग त्याला कितीही कष्ट पडोत. तो कधी कंटाळत नाही. त्याला थकवा जाणवत नाही. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करण्याची त्याची तयारी असते. मोठ्या उमेदीने तो अहोरात्र कष्ट करत असतो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाच्या गरजा भागवतो. वर्षभर पुरेल इतक्या धान्याची तजबीज करतो. जेणेकरून संसार उघड्यावर पडणार नाही. पण आता काय करावं त्यानं, कुणाला सांगावं आणि कोण त्याची मदत करणार? सरकार दरबारी खेट्या घालूनही कितीसं अनुदान मिळणार. म्हणून मनोमनी शेतकरी पावसाला साद घालत असतो. तू बरसला की सगळं काही ठीक होईल ही वेडी आशा.कधी पाऊस असला तर मालाला भाव नाही. तर कधी अवकाळी पाऊस. कधी दुष्काळ. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत देत तो आयुष्याचं गणित सोडवत जातो. सर्व सहन करत जातो. सोशिकता, सहनशीलता गुण जणू त्याच्या अंगी बाणवतो. खूप त्रास त्याला होतो पण तो हिंमत हरत नाही. निसर्गाने साथ दिली तर तो कधीच हार मानत नाही.पण जेव्हा सहन होत नाही, सर्व सहन शक्तीच्या पलीकडे जातं तेव्हा मात्र तो हताश होतो, निराश होतो व आत्महत्येकडे वळतो. कितीही कष्ट केले आणि निसर्ग कोपला तर त्यात त्याची काय चूक. शेतकऱ्याच्या आयुष्यात कितीतरी अडचणी असतात. बी-बियाणां पासून ते पेरणी, कापणी, मळणी पर्यंत त्याला कष्ट उपसावे लागतात.
आज कष्टाचे काम करायला कोणी धजत नाही. पण तो मात्र इमाने इतबारे आपलं काम रात्रंदिवस चालू ठेवतो. पाऊस येईल या आशेनं.डोक्यावर कर्जाचा डोंगर, उपवर झालेली मुलगी, मुलांचे शिक्षण आणि वरून येणारा दुष्काळ त्याच्या दुःखाची मालिका कधी संपतच नाही. शेतकरी हा आपला अन्नदाता. जगाला अन्न पुरवणारा. खरोखरच त्याचं कार्य सर्वांपेक्षा मोठं आहे. पण परिस्थिती मुळे तो मजबूर होतो. हातात पीक आले नाही तर त्याच्या जीवनाची फरफट सुरू होते.त्याची लाईट कापली जाते. येणाऱ्या प्रत्येक समस्येला त्याला मोठ्या हिमतीने तोंड द्यावे लागते. मराठवाडा, विदर्भ खानदेश इथे मागील काही दिवसात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. मदत तर नाही कोणाची आणि कुटुंबाचा आधार ही गेला.शेतकऱ्याला कधीच आपल्या मनासारखं आयुष्य जगता येत नाही. सततची चिंता, दुःख, काळजी याने तो ग्रासून गेलेला असतो.भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सर्वाधिक जनता ही शेतीवर अवलंबून आहे. पण कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ. शासनाचे कृषी विषयक धोरणे जी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फारशी उपयोगी पडत नाही. त्यामुळेच शेतकऱ्याचे जीवन हे खडतर झाले आहे आणि आत्महत्येच्या निर्णयापर्यंत ते येऊन पोहोचतं आहेत.या निर्णयापर्यंत कोणीच येवू नये म्हणून त्यांचे कुटुंब, कारभारीन दुःखातही सुख मानते.मुलांना कधी हट्ट माहित नसतो. कुटुंबात काही अघटित घडू नये यासाठी ते सुद्धा मनोभावे देवाला विनंती करतांना दिसतात.
नको करू आम्हास पोरके
देवा तुझ्या चरणी
ठेवतो रे डोके
करू नकोस तू
आम्हास पोरके
चटणी भाकर खाऊन
जगू आम्ही खुशाल
मागणार ना कपडे नवे
पांघरू खुलं आभाळ
नाही कधी सणवार
राबराब आम्ही राबतो
कधी निसर्ग देई धोका
कधी व्यापारी नाडतो
उरले सुरले शिल्लक
त्यालाही नाही भाव
सांग आता तूच देवा
कसा सोसावा घाव
हाल बघून आमचे
होती बापाला वेदना
सल टोचते त्याला उरी
आत्महत्येचा विचार येतोना
दुःख जाईल समजावतो
नाही कधी त्रास देत
पण मन वैरी ना रे
जगतो आम्ही भयभीत
_मलेका शेख- सैय्यद
(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)