जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दरवर्षी २१ जून हा दिवस आपण जागतिक योग दिन म्हणून देशभरात साजरा करतो. योग हे प्राचीन शास्त्र किंवा विद्या आहे. या प्राचीन शास्त्राने केवळ आपली अमूल्य परंपरा समृद्ध केली नाही तर या शास्त्राच्या साधकांचे जीवन समृद्ध केले आहे. योग या शब्दाचा अर्थ एकमेकांशी जोडले जाणे. शरीर व मन जोडल्या गेल्याने आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक व सामाजिक घटकांना स्वतःशी जोडणे किंवा स्वयं अनुभवातून जोडणे म्हणजे योग होय. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन सर्वांगीण प्रगती करता येते. संतुलन प्राप्त करता येते. जीवनात योगासनांचे फायदेही भरपूर आहेत. योगासनांमुळे शरीराच्या अंतर्गत भागांना देखील पुरेशा प्रमाणात मसाज व व्यायाम मिळतो. त्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ स्वस्थ व निरोगी राहू शकते. म्हणूनच पाश्चिमात्य देशांनी योगासनांचा स्वीकार केल्याचेही दिसून येते. आपल्याला कोणत्या प्रकारची योगसाधना करावी वाटते त्यानुसार आसनांचे प्रकार पडतात.
-
ध्यानात्मक असणे त्यात पद्मासन, अर्ध पद्मासन, सुखासन येतात.
- Advertisement - -
शरीर संवर्धनात्मक आसने यात हलासन, धनुरासन, वृक्षासन, शिर्षासन इत्यादी प्रकार येतात.
-
विश्रांतीकारक आसने यात शवासन, मकरासन इ.आसने येतात.
योगासनांमुळे मन:शांती मिळते. व्यक्तीची एकाग्रता वाढते. अंतस्रावी ग्रंथी कार्यक्षम होतात. त्याचबरोबर शरीरातील मेद कमी होतो आणि जोम वाढतो. पाठीचा कणा, स्नायू व मज्जातंतू सुदृढ बनतात. उंची वाढवण्यास आसनांचा उपयोग होतो. पोटातील इंद्रियांचे कार्य सुधारते त्याचबरोबर रक्ताभिसरण क्रिया चांगल्या प्रकारे होते. चेहऱ्याचे स्नायू कार्यक्षम बनतात व चेहरा तेजस्वी दिसतो. योगासनांमुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाचे कार्य सुधारते. आकुंचन, प्रसरण, ताण यांमुळे रक्ताभिसरण चांगले होते. स्नायूंना पोषण मिळते. ते सशक्त, कार्यक्षम व घोटीव बनतात. स्नायू व तंतू यांचे स्वास्थ्य टिकते. ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायूंना पूर्ण व्यायाम मिळतो. तसेच योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढते. व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन सकारात्मक होतो. रक्त शुद्ध व प्रवाही राहते. श्वसन संस्था सुधारल्याने प्राणवायूचा पुरवठा अधिक प्रमाणात होऊन कामातला उत्साह वाढतो आणि थकवा जाणवत नाही. म्हणजेच व्यक्तीची कार्यक्षमता वाढते, रोगप्रतिबंधक शक्ती वाढते, प्रसन्नता वाढते.
व्यक्तीची सारासार विचार करण्याची व एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित करण्याची क्षमता वाढते. शारीरिक स्तरावर विविध आसने करून योग अभ्यास केला जातो. त्यामुळे मन आनंदी व उत्साही राहते. योग करणारा व्यक्ती कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सदैव सज्ज असतो. शरीर तंदुरुस्त व अनेक आजारांपासून आपण दूर राहतो. सुदृढ शरीरात सुदृढ विचार असतात असे मानले जाते. ज्ञान प्राप्तीसाठी अभ्यासाला जसे महत्व दिले जाते तसेच निरोगी व सुदृढ शरीरासाठी योगाला महत्त्व दिले जाते. शरीराला व्यायाम मिळतो व शरीर बळकट होते. जीवनात दुःख, संकटे सहन करण्याची शक्ती योगामुळे आपणास प्राप्त होते. निरोगी शरीर व स्वस्थ मनासाठी योगासने फारच आवश्यक आहे. दररोज योगा केल्याने शरीराला ऊर्जा व मनाला शांती मिळते. आजच्या धावपळीच्या काळात आपले शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी व स्वस्थ शरीरासाठी योगा खूप महत्त्वाचा आहे. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी योगासने हा रामबाण उपाय आहे. त्यामुळेच योगाचे महत्त्व सर्व विश्वाला पटले आहे. योग व्यायामाचा महत्त्वपूर्ण प्रकार असून ज्यामुळे शरीराच्या अवयवांचेच नव्हे तर मन, मेंदू आणि आत्म्याचं संतुलन केलं जातं. इतकच नाही तर हाडे, स्नायू व सांधे मजबूत होतात. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपले जाते. शक्यतो योगा हा पहाटे करावा. शरीर सुदृढ असेल तर आरोग्य ही सुदृढ असते. असे म्हटले जाते Sound in Body is Sound in Mind म्हणजे शरीर मजबूत असेल तर मन मजबूत राहते. म्हणून आपण प्रत्येकानेच आपल्या आरोग्यावर लक्ष दिले पाहिजे. योगामुळे भूक चांगली लागते.मन प्रसन्न राहते त्यामुळे दुसऱ्या दिवसाची चिंता वाटत नाही.म्हणून आपण प्रत्येकानेच स्वतःसाठी दररोज वेळ काढून योगासने केली पाहिजे व आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
_मलेका शेख- सैय्यद
(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)