Saturday, September 14, 2024
Homeब्लॉगस्त्री मनाच्या वेदना

स्त्री मनाच्या वेदना

गर्भात असल्यापासूनच स्त्रीला संघर्ष करावा लागतो. तिची नेहमीच उपेक्षा, अवहेलना केली जाते. वेदनांचा डोंगर सोसत, सहन करत करत झगडावे लागते तिला. इथूनच स्त्रीमनाची फरफट सुरू होत जाते. गर्भात असणारी मुलगी नको असल्याने स्त्री चा बळजबरी गर्भपात केला जातो. काही ठिकाणी घरच्यांच्या जाचामुळे तर कधी कधी मुलीच झाल्याने. अशा परिस्थितीत स्त्री च्या मनाची घालमेल होते,घुसमट होते.पहाटे उठण्यापासून ते रात्री सगळे झोपी गेले तरीही तीचे काम चालूच असते. दिवसभर तीचे कष्ट चालूच असतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक वेदना तिला सतत सहन कराव्या लागतात आणि निमूटपणे ती हे सगळे सहन करते. ती कुणाकडेही ब्र शब्दाने बोलत नाही की तक्रार करत नाही.सर्वात जास्त दुःख सहन करण्याची ताकद ही तिच्यात असते. बालपणी घरात होणारा भेदभाव आणि नेहमीच वडिलांच्या मर्जीत राहणं.

लग्न झाल्यानंतर ही येणारी संकटे, तिला होणारा त्रास ती सहन करत जाते व नेहमीच नवऱ्याच्या मर्जीत राहते. म्हातारपणातही तिला मुलांच्या मर्जीप्रमाणे राहावे लागते. तिला कधीच मनासारखे, मन मोकळे जगता येत नाही. विशेष म्हणजे लग्न करून सर्वकाही सोडून ती ज्या व्यक्तीसाठी आलेली असते त्या व्यक्तीने ही तिला समजून घेतले नाही तर ती तुटून जाते. जी स्वप्न तिने पाहिलेली असतात त्याची क्षणात राख होते. तरीही ती पुन्हा उमेदीने जगण्याचा प्रयत्न करते. समजून घेऊन संसार सावरण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच वेळेला पुरुष आपल्या बोलण्यावर ठाम असतात. त्यावेळी ते एक अनुभवी व समजदार पुरुष ठरतात. पण जेव्हा एक स्त्री आपल्या बोलण्यावर ठाम असते तेव्हा तिला घमंडी, अहंकारी, असंस्कारी, जिद्दी, मूर्ख बोलले जाते व मानलेही जाते. खरंतर स्त्री ही परमेश्वराची उत्तम कलाकृती आहे. कारण तिच्यात सहनशीलता, काळजी, ओढ, प्रेम, जिव्हाळा अशा सगळ्या भावना दिसून येतात. कुठल्याही काळातील स्त्री असो ती नेहमीच आपल्या माणसांसाठी झटत असते,कष्ट करत असते. ती नेहमी सर्वांच्या सुखाचा विचार करते. सगळ्यांची काळजी घेते. पण तिची काळजी खरचं कोणी घेता का?आपण सगळेच आपल्या मनासारखे जगतो पण तिला कधी तिच्या मनासारखं जगता येतं का? तिला कोणीही बोललं तरी तिने सर्व गप्प ऐकून घ्यावं, सहन करावं अशी आपली अपेक्षा असते.

- Advertisement -

आपण मात्र कोणाचेही ऐकून घेत नाही. पण तिने उलट बोललेलं किंवा समजून सांगितलेलंही आपल्याला चालत नाही. त्यामुळे तिला नेहमीच शारीरिक, मानसिक व भावनिक वेदना सहन कराव्या लागतात. शहरातील किंवा शिकलेल्या मुली तरी आता काही प्रमाणात बोलतात. पण ग्रामीण भागात तर बोललेलं, उलट उत्तर दिलेले ही चालत नाही. बोलणं तर दूरच तेंव्हा तक्रार कधी करायची. आजही खेडेगावात नवरा व्यसनी असेल तर पत्नीची मारझोड केली जाते आणि यात पुरुषार्थ मानला जातो.कुठलीच हौस मौज नाही. तिने सर्व कुटुंब सावरायचं. मोलमजुरी करायची आणि वरून मारही खायचा. अशा स्त्रीची खूप फरपट होते. माहेर चांगले असेल तर ठीक नाहीतर तिला कोणी जवळही करत नाही. कायमचेच म्हणून सोडून दिले जाते. घरात भरपूर धनधान्य नाही की मुलांची, तिची कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही. व्यसनी नवऱ्यामुळे दोन दिवस ती निवांत माहेरीही जाऊ शकत नाही. त्यातही ज्या स्त्रीला मुलीच झाल्या तिचं जीवन तर नेहमीच समस्यांनी भरलेलं. घरचे तर साथ देत नाहीच पण नवराही साथ देत नाही तेव्हा तिने काय करावं. आपल्याकडे नातेवाईक, घरची मंडळी, नवरा हे सर्वच त्या स्त्रीला दोषी ठरवतात पण त्यात तिची काय चूक.अशा त्रासाला कंटाळून आजही काही स्त्रिया आपलं आयुष्य संपवतांना दिसतात. तर काहींचे आयुष्य सासरची लोक हाताने संपवतात. आजही हुंड्यासाठी स्त्री चा जीव घेतला जातो. लग्न झाल्यानंतर तिने आई-वडिलांकडून अमाप संपत्ती आणावी, गाडी, बंगला घेण्यासाठी पैसे आणावेत आणि नाही आणले तर तिचा मृत्यू ठरलेला. कोणी जाळून मारतं तर कोणी विहिरीत ढकलून देतं. असे अनेक प्रकार दिसून येतात. याहूनही भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासना-या अशा अनेक घटना आपल्याकडे घडत आहे.

ग्रामीण भाग असो वा शहरी दिवसाढवळ्या अनेक मुलींवर, स्त्रियांवर बलात्कार होत आहे आणि स्त्रियांचे चारित्र्य भंग केले जात आहे.स्त्री माता, भगिनी, पत्नी ती कोणत्याही रूपात असो आपण तिचा आदर केला पाहिजे. पण दुर्दैवाने काही राक्षसी प्रवृत्तींच्या लोकांमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. निर्भया नाव ऐकताच थरकाप उडतो. अंगावर काटे येतात. पण आज कितीतरी मुली निर्भयासारख्या या वेदनेतून, दुःखातून गेल्या आहेत. किती तरी मुलींचे रिलेशनशिप मध्ये तुकडे झाले आहेत तर काहींनी आत्महत्या केली आहे.काय होती त्यांची चूक. फक्त स्त्री म्हणून जन्माला येणे. आजही कितीतरी मुली अत्याचाराच्या शिकार होतात. पण इज्जतीसाठी कोणी बोलत नाही. बदनामी नको म्हणून कितीतरी अपराध कायद्याच्या चौकटीत येत नाहीत आणि आले तरी त्याला कितपत न्याय मिळेल. पुरुषसत्ताक संस्कृतीत स्त्रियांना दैवत मानलं गेलं. पण प्रत्यक्षात स्त्री उपेक्षितच राहिली आहे. कधी घरात, कधी बाहेर कुठेच ती सुरक्षीत नाही. आजच्या काळात तरी काही स्त्रिया चाकोरीबध्द जीवनातून बाहेर पडू लागल्या आहेत. पण ग्रामीण भागात अजूनही स्त्रियांना बाहेर पडायची संधी फारशी उपलब्ध नाही. मनासारखे काही करता येत नाही. त्यामुळे त्यांना मन मारूनच जगावे लागते. पिढ्यानपिढ्या चाललेला हा भेदभाव आजही चाललेला आपल्याला दिसून येतो. मुलगाच हवा या हट्टापायी कितीतरी स्त्रियांचा छळ केला जातो. समाजात प्रचलित असलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा स्त्रियांच्या शोषणाला जबाबदार आहेत असे नाही वाटत का? चुल आणि मुल, घरातल्या जबाबदाऱ्या यातच त्यांचा श्वास कोंडला जातो. आज स्त्री शिकली, पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागली समाजात प्रगती झाली. तरी अजूनही लोक मानसिक दृष्ट्या सक्षम झालेले दिसत नाही. आता चुल मुल ही संकल्पना बदलली. त्यासोबतच एक कर्तव्यदक्ष आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्त्री नोकरी, व्यवसाय करते आहे. पण सगळ्या स्त्रियांना ती मिळते असे नाही. म्हणून एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण तिचा आदर केला पाहिजे आणि तिला मुक्त श्वास घेण्यासाठी आपण सर्वांनीच साथ दिली पाहिजे. तसा प्रयत्न केला पाहिजे नाही का?

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या