Saturday, May 18, 2024
Homeब्लॉगसकारात्मक विचारांची गरज

सकारात्मक विचारांची गरज

जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जीवन जगतांना नेहमी आनंदी राहायचे असेल तर सकारात्मक विचार केला पाहिजे. जीवनात छोटी-मोठी संकटे येतच असतात त्यावर मात करत आनंदाने जीवन जगता आले पाहिजे व त्यासाठी आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. जीवनात ध्येय साध्य करतांना माणसाने नेहमी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व संयमाने कार्यरत राहिले पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे व जे वास्तव आहे त्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. मनुष्याने जीवन जगतांना कुठल्याही भ्रमात राहू नये. उमेदीने जगण्यासाठी जर कष्टाची कास धरली तर नक्कीच ते आपले जगणे आनंददायी होते. कोणतेही काम मन लावून व आनंदाने केले पाहिजे. स्वतः चांगले जीवन व्यतीत करून स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार केला पाहिजे.

चांगुलपणावर विश्वास ठेवला पाहिजे. खरंतर माणसाचे मन हे अजब आहे. इतक्यात इथे तर इतक्यात कुठेही ते धावत असते आणि त्याबरोबर त्याचे विचारचक्रही. मनात परस्पर विरोधी भावना आणि विचार प्रवाह वास करत असतात. बऱ्याचदा माणसाच्या मनामध्ये नकारात्मक विचार पटकन येतात. त्यामुळे मनामध्ये नकारात्मकता येते. आपण नकारात्मक विचार करू लागतो. त्यावेळी आपले मन कशात लागत नाही. एक प्रकारची हुरहुर वाढते. ज्यामुळे आपण कुठलेही काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आपण निष्क्रिय होतो. मन आनंदी नसल्यामुळे एक प्रकारची मरगळ येते. मनात खूप काही करण्याची इच्छा असतांनाही त्यावेळी आपणास काही करण्याची इच्छाच होत नाही. नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रत्येकाच्या मनात सकारात्मक व नकारात्मक विचार येत असतात.आपण सकारात्मक विचारांबरोबरच नकारात्मक विचार व भावना यांचा चांगल्या कार्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा.त्यासाठी आपल्याकडे हुशारी असायला हवी. ज्यावेळी आपल्या मनात परस्पर विरोधी भावना व विचार येतात त्यावेळी त्या नकारात्मक गोष्टींना न घाबरता आपण विचारांचं संतुलन ठेवायला हवं. कारण नकारात्मक विचार हे आपल्या प्रगतीला मारक ठरतात. आपली प्रगती रोखणारी असतात. त्यामुळे त्यावर मात करून सृजनशील विचार, सकारात्मकता रुजवली पाहिजे.

- Advertisement -

ज्याप्रमाणे गाडीच्या सुरक्षिततेसाठी गाडीत ब्रेकची आवश्यकता असते त्याला घाबरण्याची कारण नाही. त्याप्रमाणे नकारात्मक विचार जेव्हा मनात येतात तेंव्हा घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यासाठी सावधगिरी कशी व कुठे बाळगावी याचे भान निर्माण होतं आणि चुकीच्या निर्णयांना देखील आळा बसतो. त्यासाठी सतत आपल्या विचारांचं संतुलन राखायला हवं. नेहमीच चांगल्या मनाने व विचाराने केलेली कृती ही महत्त्वपूर्ण असते. सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवत असतात. म्हणून माणसाने नेहमी चांगल्या गोष्टीचा विचार करावा. परावलंबित्वाचे कवच फोडून स्वकष्टाने जगावे. आपल्या क्षमतांवर,सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. ज्यावेळी व्यक्तीला स्वःसामर्थ्याची जाणीव होते त्यावेळी ध्येयाची उंच शिखरे तो पादाक्रांत करू शकतो. उत्तम यश मिळवून आनंदी जीवन जगू शकतो. त्यामुळे नकारात्मक विचार करू नये. त्याचा आपल्या शरीरावर देखील परिणाम होतो. म्हणून आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी सकारात्मक राहणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपले शरीरही स्वस्थ राहते. आपण जेंव्हा जेंव्हा संतुष्ट व आनंदी राहतो त्यावेळी आपले शरीरही आपणास उत्तम साथ देते. ब-याचदा नकारात्मक विचार हे पटकन माणसावर अटॅक करतात. म्हणून आपण अध्यात्माकडेही वळले पाहिजे. त्यामुळे आपले विचार सकारात्मक होत जातात. सहनशीलता वाढते. क्षमाशील राहिल्याने आपले आरोग्य चांगले राहते. एक चांगला विचार आपले आयुष्य बदलण्यास उपयोगी पडतो. म्हणून कुठलेही काम करतांना नैराश्य न बाळगता ते उत्साहाने केले पाहिजे. सकारात्मकतेने केले पाहिजे.

नकारात्मक विचार हे माणसाला अपंग बनवतात म्हणून आपले मनोबल वाढवण्यासाठी, आपला गोल पूर्ण करण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. त्यामुळे मन छोटे, निराश, नाराज होत नाही. आपल्याजवळ काही गोष्टी कमी अधिक असतीलही तरी आपण नेहमी पॉझिटिव्ह एटीट्यूड ठेवला पाहिजे. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार केलाच पाहिजे. त्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक संवादाने सुरू केली पाहिजे. स्वतः शी संवाद केला पाहिजे.चांगल्या चांगल्या गोष्टी आठवल्या पाहिजे. चांगला विचार केला पाहिजे. त्यामुळे शरीराला सकारात्मक विचार करण्याची सवय लागते. आपल्यावर आलेले दुःख न सांगता त्या दुःखाचं, संकटाचं संधीमध्ये आपण रूपांतर केलं पाहिजे. जगात जी मोठमोठी लोक झाली त्यांच्याही आयुष्यात बरीच संकटे आली आणि या संकटांना हसत हसत ते सामोरे गेले आणि मोठे झाले. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला, सकारात्मक विचार केला की त्यामुळे समस्येकडे बघण्याची दृष्टी बदलते. ‘दृष्टी बदलली की सृष्टी बदलते’ असे म्हणतात. मनाला नकारात्मक विचार करण्याची खूप सवय असते.काहीही विचार करायला लागलो की आधी नकारात्मक विचार येतात.आपण जसा विचार करतो तसेच आपण वागतो. त्यामुळे ताकद कमी होते,नैराश्य येतं. भविष्याची किंवा जीवन जगण्याविषयीची चिंता वाढते. प्रत्येक गोष्टीत मग आपल्याला हार दिसू लागते.मग ती संकटे,दुःख मोठी वाटायला लागतात. म्हणून मी सर्व काही करू शकतो हे आपण स्वतःला वारंवार म्हटले पाहिजे. त्यामुळे आपोआप चैतन्य येते. विचारांची शक्ती वाढते आणि संकटे छोटी वाटायला लागतात. संकटांची भीती वाटत नाही. त्यामुळे हिम्मत वाढत जाते. म्हणूनच आपण आपल्या विचारांना बदलले पाहिजे. सकारात्मक विचार करण्याची सवय लावून हळूहळू ती सवय आत्मसात केली पाहिजे. आयुष्यात नको त्या गोष्टींना आपण प्रमाणापेक्षा जास्त कवटाळतो, त्यांना महत्त्व देतो त्यामुळेही आपल्याला नैराश्य येते. म्हणून आयुष्याकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीने आपण पाहिले पाहिजे व सकारात्मकच विचार केला पाहिजे.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या