काही महिन्यांपूर्वी मराठी लेखक सोनाली नवांगुळ, भालचंद्र नेमाडे आदींना साहित्य अकादमीने गौरवले होते. आता साहित्य अकादमीने पुरस्कारांनी गौरवलेले लेखक युवक असून सामान्यांमध्ये वावरणारे असल्याने त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार सामान्यांना अधिक जिव्हाळ्याचा वाटला तर नवल नाही.
साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभणे हा त्या लेखकाचा जसा सन्मान असतो तसाच ते ज्या भाषेत लिहितात आणि ज्या राज्याचे ते प्रतिनिधी आहेत, त्यांचाही सन्मान असतो. मोठ्या लेखकांना पुरस्कार मिळाला तर त्यांचे कौतुक होणे स्वाभाविक आहे; परंतु सामान्यांचे प्रतिनिधी असलेल्यांना आणि तुमच्या-आमच्यात ज्यांचा सातत्याने वावर आहे आणि सामाजिक नाळ तुटलेली नसणार्यांना पुरस्कार मिळतो तेव्हा त्याचे कौतुक वेगळेच असते. साहित्य अकादमीने 22 भाषांमधल्या पुरस्कारांची घोषणा केली. ती यादी लांबलचक आहे; परंतु आपल्या दृष्टीने तीन नावे जास्त महत्त्वाची आहेत. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या पुस्तकासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांना साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार, मराठीतले युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे तर संजय वाघ यांना बाल पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण गुरव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, साहित्य अकादमी पुरस्काराचा खूप आनंद होणे स्वाभाविक आहे. माझ्याबरोबरच कथा या साहित्य प्रकारालाही या पुरस्काराने बळ दिले आहे.
खेड्यापाड्यातल्या नव्याने लिहिते होणार्या मुलांना कथा हा साहित्य प्रकार त्यातल्या वेल्हाळपणामुळे आपलासा वाटतो. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या शीर्षक कथेतला बाळू हा अशा मुलांचा प्रतिनिधी आहे. शिक्षणासाठी शहराकडे होणारे बाळूचे स्थलांतर हळूहळू त्याचे मानसिक अवस्थांतर बनते. बाळूची खेडूत मानसिकता आणि तिला दिसणारे अक्राळविक्राळ शहर यांच्यातला संघर्ष हा एक सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातल्या अनेक मुलांना ही आपलीच कथा वाटते. या संग्रहातली इंदुलकरांची कथादेखील कथानिर्मिती, लेखकाचे चरित्र आणि त्याचा काळ यांची परस्पर गुंफण तपासते. या इंदुलकरांना कधी कधी त्राग्याने जीवसृष्टीत जन्माला आल्याबद्दल वाईटही वाटते, पण कथेत सरतेशेवटी ते आपल्या जन्मास कारण ठरलेल्या भैरीस्वरूप निसर्गाचे, आई-वडिलांचे ऋणी होतात. आपला जन्म म्हणजे या सर्वांनी मिळून सृष्टीत घडवून आणलेला एक छोटासा जैविक महास्फोट आहे, या निष्कर्षाला ते अखेरीस येतात. माझ्यापेक्षा हा कथेचा सन्मान आहे, असे मी समजतो असे ते म्हणतात.
मराठी कथेला आणि खेड्यातल्या अनेक लिहित्या हातांना या पुरस्काराने ऊर्जा मिळावी अशी अपेक्षा. कोल्हापूरजवळच्या खेड्यात राहून कथालेखन करणार्या गुरव यांच्या कथा राज्यस्तरीय स्पर्धांमधून विजेत्या ठरल्या आहेत.
प्रणव सखदेव हे मराठीमधल्या आघाडीच्या तरुण लेखकांमधले प्रसिद्ध नाव आहे. ‘पायर्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, ‘निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ हे कथासंग्रह आणि ‘काळेकरडे स्ट्रोक्स’, ‘96 मेट्रोमॉल’ या त्यांच्या कादंबर्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी प्रमुख मराठी दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे. ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक आणि अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. अनुवाद-प्रकल्पासाठी त्यांना 2015-16 ची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिके मिळाली असून त्यांनी इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणे आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येते. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही त्यांची कादंबरी आजच्या जगण्याचे संदर्भ घेत तरुणाईचे एक वेगळे भावविश्व, त्यातली आवर्तने आणि आंदोलने उभी करते. या कादंबरीतल्या पात्रांच्या जीवनात चांगले साकारायला जावे आणि सतत फटकार्यांनी चित्राचे सौंदर्य बिघडावे, असे प्रसंग घडतात. तरुणाईचे विस्कटलेले भावविश्व प्रणव सखदेव यांनी या कादंबरीत उत्तमरीत्या मांडले आहे. सहज आणि साधी संवाद शैली, व्यक्तिरेखा उभी करण्याची उत्तम हातोटी, ओघवते लेखन ही या कादंबरीची बलस्थाने आहेत.
चरितार्थासाठी पत्रकारिता आणि आवड म्हणून लेखन करणार्या संजय वाघ यांना बालसाहित्यातल्या योगदानासाठी यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. वाघ यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना नाशिकच्या सावाना वाचनालयाचा बालसाहित्यिक पुरस्कार मिळाला होता. पुरस्काराबद्दल ते म्हणतात की, साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणे ही तशी प्रत्येक लेखकासाठी सर्वोच्च आनंदाची आणि अभिमानाची बाब असते. त्या आनंदाचा मी एक भाग झालो याचे अतीव समाधान आहे. आत्मविश्वास हरवलेल्या मुलांना प्रेरणा, उभारी मिळावी या हेतूने लिहिलेल्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीवर पसंतीची मोहोर उमटल्याने आपल्या लेखनाचे चीज झाले असे मला वाटते.
संजय वाघ हे एक संवेदनशील बालसाहित्यकार आहेत. ‘जोकर बनला किंगमेकर’, ‘गोष्ट बोलक्या पोपटाची’ आणि ‘बेडकाची फजिती’ ही त्यांची बालसाहित्यातली पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना बालसाहित्यासाठी मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या ‘गाव मामाचं हरवलं’ या बाल कवितासंग्रहात बालकुमारांच्या आवडीच्या विषयावरील 23 कविता आहेत. प्रस्तुत संग्रहाची पाठराखण करताना ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे म्हणतात त्याप्रमाणे बालसाहित्य लिहिणे ही अतिशय गंभीरपणे करायची कृती आहे. वाघ हे बालसाहित्याकडे तितक्याच गंभीरपणे पाहतात, हे संग्रह वाचताना जाणवते.
अशा युवांमधील साहित्यिकांच्या या सन्मानामुळे नवोदित लेखकांनाही स्फूर्ती मिळेल यात शंका नाही.
उर्मिला राजोपाध्ये