कोरोना महामारी आली आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. कोणी कोणाला भेटेना. संवाद तर दूरची गोष्ट पण कोणी जवळ येऊन उभे ही राहिना. जवळचे असो की लांबचे सर्वच नातेवाईक, मित्र दूर-दूर राहू लागले. एव्हढेच नाही तर आपल्याच घरातील माणसे जरा कुठे बाहेर गेलो आणि सरदी, खोकला झाला तर वेगळ्याच नजरेने बघत व बाजूला रहायचा सल्ला देत होते. जीवाच्या भीतीने कुठे बाहेर ही जाता येत नव्हते. शाळा, काॅलेज आणि विविध आॅफिस ही आता हळूहळू बंद झाले होते. एरव्ही सुट्यांमध्ये सर्व मुलं जमून क्रिकेटचा डाव मांडायचे, पण आता शाळा, काॅलेजातल्या मुलांना सुट्टी असूनही कोणी एकत्र येत नव्हते की, एकमेकांना भेटण्याचा प्रयत्नही करत नव्हते. इतर वेळी एकमेकांशिवाय न राहणारी ही मित्र कंपनी पण जीव गमावण्याच्या भीतीने सर्वच शांत झाले होते.
इतर वेळेस रिकाम्या कट्यावर जोरजोरात गप्पा मारणारी ही मंडळी आज साधी चौकशीही करेनाशी झाले. फोनवर ही कोणी बोलेना. घरातही जीव आता गुदमरू लागला होता. रोज तेच- तेच, तोच टी. व्ही. तोच मोबाईल काय करावे कळतही नव्हते. ना कुणाला भेटता येत होते. ना कुठे बाहेर जाता येत होते.माझ्या घरासमोर एक स्मारक आहे. त्यात दररोज सकाळी, सायंकाळी वृद्ध माणसे, स्त्रिया, मुले फिरायला यायचे.आल्यानंतर काही वेळ ते स्मारकात बसायचे. एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात बराच वेळ जायचा. लहान-लहान मुलांचा तिथे किलबिलाट असायचा. काही मुले बाजूला जावून अभ्यास करत बसायची. कोणी वर्तमानपत्र वाचे तर कोणी मित्रांमध्ये गप्पा मारण्यात रमूण गेलेले दिसे. पण आता मात्र स्मारकही शांत झाले होते. सगळीकडे नुसता शुकशुकाट दिसत होता. वृद्ध माणसे हे सगळे समजून घेत होते पण मुलांना घरात बसणे म्हणजे अग्नीदिव्यच होते.
अशा परिस्थितीत मुले जरी शाळेत नव्हती तरी आम्ही शाळेत जात होतो. आपापल्या आरोग्याची काळजी घेऊन ऑनलाईन, ऑफलाईन वाड्या, वस्त्यांवर जावून शिकवत होतो. आम्हाला पाहिल्यावर जवळची काही मुले शाळेत येऊन आमच्याशी बोलायची. घरात बसून बसून मुलेही कंटाळली होती. मॅडम शाळा कधी भरेल विचारायची. आम्ही नाही म्हटलो की हिरमुसली व्हायची. मॅडम कोणीच खेळायला येत नाही, करमत नाही म्हणायची. ब-याच मुलांची खंत होती की, एकही मित्र मैत्रीण भेटत नाही. कोणाचेही आई-वडील एकमेकांकडे जाऊ देत नाही. मुलांचे ते निरागस बोलणे ऐकुन खूप वाईट वाटायचे. त्यांचे खेळण्या बागडण्याचे दिवस जणू कोमेजले होते. कधी एकदाचे हे दिवस संपतील असे त्यांना झाले होते. त्यावेळेस ते शाळेचे जुने दिवस आठवले. हसणं, खेळणं, बोलणं, एकत्र अभ्यास करणं, खूप गप्पा मारणं, शाळेत सोबत ये- जा करणं, कोणी आजारी पडलं तर घरापर्यंत सोडून देण्याची खात्री, खेळतांना कितीही वाद झाला तरी पुन्हा एकत्र जेवण करायला बसणे अशा खूप सा-या आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या. आम्हीही या मुलांप्रमाणेच कधीही एकमेकांशिवाय राहिलो नाही.
आज आम्ही सर्व ज्याच्या त्याच्या जीवनात व्यस्त झालो आहे. अधूनमधून कुणाचा फोन आला तर किती बोलावं आणि किती नाही असं व्हायचं. आता प्रत्येकाकडे खूप वेळ होता. पण कुणालाही कुणाशी बोलायची इच्छा होत नव्हती. वरवर सगळेच चांगले वाटत होते. पण आतल्या आत सर्व धुमसत होते. या दिवसात तर खरी एकमेकांच्या उभारीची गरज होती. समजून घेण्याची आणि समजवण्याची गरज होती. पण सगळं थांबलं होतं. मनातले भाव बोलायचे कुणाकडे हा प्रश्न होता. कॉलेज जीवनात हा प्रश्न कधी पडलाच नाही सर्व मिळून समस्या सुटत होत्या पण आज नाही. प्रत्येकालाच एकमेकांशी बोलायचे होते मनातल्या गोष्टी सांगायच्या होत्या. एक दुसऱ्याविषयी जाणून घ्यायचे होते. पण कोणीही व्यक्त होत नव्हते. एक काळ असा होता की एक क्षण ही दूर न राहणारे हे मित्र मैत्रिणी पण आज संसाराच्या रहाटगाड्यात अडकले होते. कुणालाही कुणासाठी वेळ नव्हता आणि ती गोष्टही नव्हती जेंव्हा पाठीवर थाप पडायची. सर्वच आपापल्या जीवनात व्यस्त झालेले. जीवनाच्या या चक्रात प्रत्येक जण जगत होता पण स्वतःच्या मनाला मारून त्यामुळे स्मारकातील ती वृद्ध माणसे असो, शाळेतील वर्गमित्र असो किंवा मित्र-मैत्रिणी असो हे प्रत्येक जण आपल्या भावना बंदिस्त करून जगत होते. त्याच भावना माझ्या कवितेतून मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
एक बात तुमसे सच मे कहेता हूँ दोस्तो
तुम मान लो दोस्तो
क्यू याद मेरी आती नही।।धृ।।
पहले तो ना मिलने पे ताना देते थे दोस्तो
गर यार हो खफा तो मनाते थे दोस्तो
वो प्यार अब कहा गया पुराना दोस्तो
ना भुलाना दोस्तो
क्यू याद मेरी आती नही।।१।।
एक बात पे सौ बाते करते थे दोस्तो
गर काम बुरा हो तो लढते थे दोस्तो
एक दुसरे को समझाते मनाते दोस्तो
ना रुलाना दोस्तो
क्यू याद मेरी आती नही।।२।।
सब उलझे है संसार मे अपने झमेले में
ना दे पाते है वक्त लगे कारोबार में
थोडा समय निकाल कर बात करलो दोस्तो
तुम सोच लो दोस्तो
क्यू याद मेरी आती नही।।३।।
कितने साल हो गये हसी ना मजाक है
ना पीठ पर वो हात ना दिल की बात है
सब कुछ भुलाकर मिलो गले दोस्तो
वो प्यार दोस्तो
क्यू याद मेरी आती नही।।४।।
_मलेका शेख- सैय्यद
(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)