Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगआनंदी जीवन जगता आले पाहिजे...

आनंदी जीवन जगता आले पाहिजे…

जीवन जगा हो आनंदाने

सर्वांशी बोला प्रेमाने

- Advertisement -

जीवन अनमोल जान मानवा

रहा तू मिळून सुखाने

जीवन जगा हो आनंदाने

खरोखरच आपल्या सर्वांनाच आनंदाने जीवन जगायला आवडते नाही का? पण खरंच विचारा आपल्या मनाला आपण रोज आनंदी जीवन जगतो का? आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या काळात प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून धावपळ करत असतो. कुणालाच कुणासाठी वेळ नाही. थोडं हसावं, बोलावं, बसावं पण इतका निवांत वेळ कुठला. आपण सर्वच जण कामाच्या ताणतणावात खरा आनंद उपभोगत नाही. खऱ्या अर्थाने आपण जीवन जगत नाही असे म्हणावे लागेल. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली की आपण किती आनंदी होतो. पण मना विरुद्ध घडली तर आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट फार मनाला लावून न घेता त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे.

विशेष म्हणजे आनंद हा शोधता आला पाहिजे. आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो. पण त्यासाठी आपलं मन, ह्रदय समुद्रासारखं विशाल असावं लागतं. मोठ्या आनंदाची संधी मिळेल किंवा नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळवू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे. नेहमी मन मोकळे असले पाहिजे आणि विशेष म्हणजे आपले मन नेहमी रिते ठेवावे. कुणाविषयी मनात अढी धरू नये. कोणाचा राग, द्वेष, मत्सर करू नये. मोठ्या मनानं नेहमी सर्वांना माफ करता आलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीची काळजी न करता वाटचाल केली पाहिजे. कुठल्याही गोष्टीची चिंता, विचार आपल्याला आनंदापासून परावृत्त करत असतात. त्यामुळे जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही. म्हणून जीवनात सकारात्मक मित्रांची निवड केली पाहिजे. चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे. कुणाशीही शत्रुत्व, वैर घेऊ नये व कोणाविषयी आकस ही धरू नये. ज्यामुळे आपले आयुष्य कठीण बनते, ज्या गोष्टीचा आपल्या मनाला त्रास होतो ती न केलेलीच बरी कारण त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद संपत जातो. नेहमी दुसऱ्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे. आपण जसे वागू, जसे बोलू तेच परत आपल्याला मिळते. त्यामुळे नेहमी सर्वांशी गोड बोलने आवश्यक आहे सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आधी आपले कुटुंब आनंदी ठेवावे आपण नकारात्मक राहिलो तर कोणत्याही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही म्हणून लहान- लहान गोष्टींवर लक्ष देऊन त्यांचा मनापासून आनंद घ्या. फार लांबचा विचार करत बसू नका. दररोज प्रसन्न रहा, उत्साही राहण्यासाठी सकाळ, सायंकाळ वेळ मिळेल तेंव्हा व्यायाम करा. आरोग्य ही खरी संपत्ती आहे त्यामुळे तिची काळजी घ्यावी व आपल्या तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे. स्वतःची तुलना कधीही कुणाशी करू नये कारण त्यामुळे दुःखच वाट्याला येते. सर्व काही चांगले होईल असा विश्वास सतत आपल्या मनात ठेवावा. कितीही दुःख, संकटे आले तरी त्याला हसत- हसत सामोरे गेले पाहिजे. समस्येचे समाधान शोधले पाहिजे.

कशीही असो परिस्थिती

वास्तव स्वीकारलं पाहिजे

दोरीवर जरी लागलं चालावं

चालता आलं पाहिजे

‘दोस्तो’ कवितेचा जन्म

त्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो. भविष्याचा फार विचार करत बसू नये. नेहमी वर्तमानात जगायला शिकावे. असे नको व्हायला की भविष्याची चिंता करता- करता वर्तमान ही आपले खराब व्हायचे. त्यामुळे नेहमी आपल्या मनासारख्या गोष्टी करा. आनंद नेहमी वाटून घ्या. तुम्ही इतरांच्या आयुष्यात सहभागी झाले तर तुमच्याही आयुष्यात कोणी सहभागी होईल त्यामुळे निश्चिंत रहा. एकटेपणापासून दूर राहा. ज्या गोष्टीपासून आनंद मिळेल त्या गोष्टी मनापासून करा.मानसिक दृष्ट्या बळकट व्हा. जीवन ही एक लढाई आहे त्यामुळे फार काळजी करू नका. नेहमी सक्षम व आत्मविश्वासाने रहा. चांगले कार्य ही आपल्या चांगल्या कामाची पावती असते. आजार होण्यापेक्षा त्याची भीती जास्त धोकादायक असते त्यामुळे आपण नकारात्मक राहिलो तर जगातील कुठल्याच गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. आनंद हा आतून आला पाहिजे. मनाला समाधान मिळते, शरीराला सुख मिळते, तसे आत्म्याला आनंद मिळत असतो. त्यामुळे मनात कोणताच अविचार नसावा. हवे तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जावे. निसर्गही आपल्याला बरेच काही शिकवून जातो. मनाची निरोगी अवस्था म्हणजे आनंद या दृष्टीने आपल्याला पाहता आले पाहिजे. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की नैराश्य येतं त्यासाठी काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक केल्या पाहिजे. काही लोक भविष्याचा जास्त विचार करतात त्यामुळे प्रकृती बिघडते म्हणून नकारात्मकता पुसून उमेदीने, आनंदाने जगले पाहिजे. हे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेले एक गिफ्ट आहे ते कंटाळवाणे न जाता उत्साहाने, प्रेमाने, आनंदात गेले पाहिजे. देण्याघेण्यातून उत्साह, प्रेम फुलवता आले पाहिजे. संवादातून आनंद देणे म्हणजे जीवन होय. सुखदुःख, अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात त्याला न घाबरता परिस्थितीवर मात करत कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहिले पाहिजे. मनासारखे काम करणं म्हणजे आनंद. सुंदर छान वातावरण निर्माण करणे म्हणजे आनंद. फार अपेक्षा न धरता जे आहे ते स्विकारनं,त्यात समाधानी राहणं म्हणजे आनंद. आवडीनुसार वेळ घालवावा म्हणजे आनंद. अशा अनेक छोट्या- छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवू शकतो. स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांनाच आनंदी जीवन जगता आले पाहिजे.

जीवन

थोडं थोडं करता करता

आयुष्य सरत जातं

आनंदाने जगायचं

मात्र राहून जातं

खूप कष्ट रात्रंदिन

विसावा जरा नाही

कमावले जरी कितीही

अपेक्षा पूर्ण होत नाही

हे हवे ते हवे सतत

गरजा वाढत जातात

दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्या

स्वतः ला मात्र सोडून देतात

हौसे खातर कधीही

रुपया मोडत नाही

पण मनातले भाव कोणी

खरच जाणत नाही

म्हणून म्हणते सोडून द्या

चिंता भविष्याची फार

सतत मिळवा आनंद

प्रत्येक गोष्टीतून अपार

मैत्री

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या