Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधमराठी शिकवतांना!

मराठी शिकवतांना!

मी मराठी आणि हिंदी भाषा शिकवायचे.इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी शिकवताना आलेले अनुभव मलाही शिकवून जाणारे होते.

1983 चा काळ. नाशिकमध्ये त्यावेळी 2/3 इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत्या. पण त्या शाळेत आपल्या मुलांना घालण्यापेक्षा, ‘ज्ञानाची खिडकी असलेली इंग्रजी भाषा तर हवी. पण..त्याबरोबरच आपली संस्कृती पण हवी’ असा विचार सुशिक्षित पालक करू लागले होते.

मी 1983 मध्ये रंगुबाई जुन्नरे इंग्लिश शाळेत रुजू झाले. तेव्हा बी.एड. होऊन 1 वर्षच झाले होते. ‘प्रशिक्षणाचा काळ’ ताजा होता. तरुण वय होते. उत्तम काम करण्याचा निश्चय होता. मला मराठी व हिंदी हेच दोन विषय शिकवायला मिळाले. प्रशिक्षणादरम्यान, मुंबईत माझे पाठ मराठी माध्यमाच्या शाळेतच झाले होते. (शारदाश्रम दादर, बालमोहन) ह्या ठिकाणी!

- Advertisement -

पाठाचे वाचन करायचे, साहित्यातील शैली संदर्भ, लेखकाची माहिती सांगायची. व्याकरण, प्रश्नोत्तरे अशा पद्धतीने मी काही दिवस धडे शिकवले. इयत्ता 8,9,10 वी चे वर्ग होते माझ्याकडे. वर्गावर नियंत्रण चांगले होते. विद्यार्थी पण हुशार होते. पण, पाठ चांगले होत असले तरी, शिकवताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर जे समजल्याचे भाव, आनंदाची भावना दिसायला हवी ती कमी होती. काहीतरी चुकत होते का? मी माझ्या मनाशी विचार करू लागले. इतर शिक्षकांशी बोलले आणि काही गोष्टी लक्षात आल्या.

‘येथे 20/30 टक्के विद्यार्थी महाराष्ट्रीयन नव्हते’

‘जे मराठी विद्यार्थी होते ते लहानपणापासून इंग्लिशी मीडियम शाळेत असल्याने, त्यांचा मराठी विषयाशी फक्त एक अभ्यासाचा विषय एवढाच संबंध होता’.

‘इतर मराठी पुस्तके त्यांनी वाचली नव्हती. मराठी नाटक, सिनेमा त्यांना आवडत नव्हते’

थोडक्यात मराठी विषयाचा अभ्यास ती मुले व्याकरण. प्रश्नोत्तरे पाठ करून करत होते. स्मरणशक्तीच्या जोरावर.

नाही! नाही! काहीतरी बदल मलाच करणे आवश्यक आहे हे मला जाणवले.

प्र. के. अत्रे ह्यांचा धडा शिकण्यापूर्वी, त्यांचा एखादा विनोद मी सांगायची. नाटकातील प्रसंगाचा पाठ शिकवण्याआधी, ‘म्हातारा इतुका न अवघे 75 शे वयोमान’ ह्या पदातील विरोधाभासाची गंमत, नक्कल विद्यार्थ्यांना करून दाखवायची.कोकणातील वर्णन करणारा धडा असला की, लहानपणी कोकणात आलेले अनुभव, एखादी ‘भुताची गोष्ट’ मी सांगत असे. मुले आनंदी झाली की, मग, त्या पाठातील अन्य महत्त्वाचे मुद्दे. परीक्षेच्या दृष्टीने त्यातील महत्त्वाची प्रश्नात्तरे हे शिकवायचे! अर्थात ह्यामध्ये वेळ अधिक जात असे. पण मुलांना मराठी विषयाची गोडी लागणे, हे मला महत्त्वाचे वाटते.

सेवानिवृत्त झाल्यानंतर एक वर्षी मला खूप जुन्या बॅचचा, प्रितीश खिवंसरा, (नाव कदाचित चुकले असेल) भेटला होता. तो म्हणाला. ‘गोखले टीचर, मी आता कोकणात ट्रीपला गेलो होतो. तुम्ही शिकवलेल्या धड्यातील नारळाची झाडे, वाडी, लाल मातीचे रस्ते, समुद्रकिनारे मला दिसले आणि 9 वी मध्ये तुम्ही शिकवलेला धडा आठवला. सगळं अगदी तुम्ही वर्णन केले होते तसेच!’

नीट आकलन केले असेल तर किती लक्षात राहते ना?

अभ्यासाला मराठी विषय घेतला त्यामध्ये चांगले मार्क मिळणे हे महत्त्वाचे आहेच. पण त्याबरोबरच त्या भाषेतील चांगल्या गोष्टी माहिती होण, संस्कृतीची ओळख होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

डॉ. बक्षी, हे पालक त्या काळात एकदा मला भेटायला आले. बरेच वर्ष परदेशी वास्तव्य केल्यानंतर ते भारतात नाशिकला आपल्या गावी परत आले होते. इयत्ता 8 वी मध्ये त्यांची मुलगी होती. परीक्षेच्या दृष्टीने, त्या मुलीची वैयक्तिक तयारी करून घेणे आवश्यक होते. मी तिचा मराठीचा अभ्यास करून घेत असे. तिची आई किंवा बाबा मला जेव्हा भेटत, तेव्हा ते मला सांगत, ‘तिला अभ्यासक्रमातील प्रश्नोत्तरे पत्रलेखन हे तर तुम्ही शिकवालच. पण त्याबरोबर गणपती उत्सवासारख्या सणांची देखील माहिती द्या. तिला आपल्या संस्कतीचा परिचय पण व्हायला हवा. ती मुलगी पण उत्साही होती. काही दिवस तिचे मराठी उच्चार थोडे वेगळे असत. पण ती शाळेतील सण-समारंभात, आरती स्पर्धेत उत्साहाने भाग घेत असे.

मीनाक्षी अय्यर (नाव बदलले आहे.) खूप हुशार, बुद्धिमान मुलगी. तिने संस्कृत विषय देखील घेतला होता. श्लोक, स्तोत्रे तिची पाठ होती. व्याकरणाचा अभ्यास होता. संस्कृतमध्ये उत्तम गुण मिळत असत. पण मराठीशी तिची मैत्री नव्हती. ‘नटसम्राट’ या नाटकातील उतारा असलेला धडा होता. एखादे महान नाटक शिकवणे म्हणजे शिक्षकाची खरंच परीक्षा असते. प्रत्यक्ष संवादापेक्षा त्या संवादामागील भावना समजून घेणे महत्त्वाचे! इंग्रजीमध्ये ‘बिटविन द लाईन’म्हणतात. दोन वाक्याच्या मधील न लिहिलेले शब्द ओळखणे. त्या नाटकात ‘माणसाने समोरील ताट द्यावे. पण बसायला पाट देऊ नये.’ असे प्रसिद्ध वाक्य आहे. मी मुलांना समजून सांगत होते. म्हातारपणी आपला पैसा जपून ठेवला पाहिजे. मुलांवरील प्रेमापोटी त्यांना सगळी आपली जमापुंजी देऊ नये वगैरे…मीनाक्षी वर्गात उठून म्हणाली, ‘पण टीचर पाट तर जास्त महाग नसतो. तो कमी किंमतीचा असतो. ताट महाग असते. मग लेखक असे का म्हणतो आहे’

मी कपाळावर हात मारुन घेतला व सर्वच विद्यार्थ्यांना समजून सांगितले की, म्हणी, वाक्प्रचारांचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. त्यामागे एखादी कथा अनुभव असतो. त्यामुळे वाक्प्रचार तयार होतो. मग हळूहळू मीनाक्षीला मराठी विषय आवडू लागला. मोठी झाल्यावर ती मराठीची बरीच पुस्तके वाचायची व मला आवर्जून फोन करून सांगायची, माझा मुलगा अंकुश ह्याला देखील मराठी पुस्तके वाचनाची आवड आहे. इंग्रजी व मराठी तो समान आवडीने वाचतो.

ह्या निमित्ताने मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते… शिक्षक म्हणून आम्हाला अभ्यासक्रम शिकवलाच पाहिजे, व्याकरण शिकवले पाहिजे पण, त्या भाषेचा प्रचार व प्रसार करायचा असेल तर त्या भाषेची गोडी मुलांमध्ये लहानपणापासून रुजवणे आवश्यक आहे. एकदा जर मराठी भाषेचा गोडवा, नवीन पिढीला जाणवला तर ते मराठीतील साहित्य वाचतील. त्या भाषेवर प्रेम करतील. आवड निर्माण करणे, हे लहान वयातच शक्य असते. म्हणून शाळेची, शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे.

घराघरात मराठी कथा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरगाथा बालगीते ऐकली गेली पाहिजेत. पोवाडे, अभंग, संत वाङ्मय मुलांच्या कानावर पडले पाहिजे.

माझ्या मुलाला, नातवाला इंग्रजी गाणे छान म्हणता येते. ह्याचा अभिमान आहेच. पण त्याचे परकीय भाषेतील उच्चार, पाठांतर जर चांगले असेल तर मग त्याला पोवाडे, श्लोक, शूरवीर गीते सुद्धा तितकीच छान, उत्तम म्हणता येतील. मराठी गाणी, गोष्टी त्यांना शिकवा. अर्थ सांगा. त्यातील गंमत, गेयता सांगता. एकापेक्षा अधिक भाषेत पारंगत करा. नातवाला दोन/तीन भाषा उत्तम येतात हे अधिक कौतुकास्पद नाही का?

‘केल्याने होत आहे रे! आधी केलेची पाहिजे’

मैथिली श्रीराम गोखले

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या