Monday, November 25, 2024
Homeब्लॉगमैत्री

मैत्री

मैत्री म्हणजे दोन जीवांच्या विश्वासाच्या वेलीवर उमललेलं एक सुंदर फुल. एक अतुट नातं जे मनाला मनाशी कायमस्वरूपी जोडून ठेवतं. त्यात कधीच तुझं माझं नसतं. जे आहे ते दोघांचं. सुखदुःखाच्या नावेत सतत हातात हात आणि खंबीरपणे साथ देणारं हे नातं म्हणजे मैत्री. कधी हट्टाने तर कधी रागावून आयुष्याला योग्य दिशा देणारं हे नातं. खरा आनंद आणि सुख देणारी ही मैत्री अनमोल असते. जी आपल्याला कधीच निराश होऊ देत नाही. ‘जो संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र’ असे आपण खूपदा ऐकले, वाचले आणि ते वास्तवही आहे. मैत्रीत श्रीमंत, गरीब, उच्च, नीच, छोटा, मोठा, धर्म, जात, पंथ असं काही- काही नसतं. कुठला भेदाभेद नसतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्ण आणि सुदामाची मैत्री जी सर्वश्रुत आहे.

हसवते रडवते पण मैत्री घडवते, सुख दुःखात हक्काने कर्तव्याला निभावते

खरंतर मैत्रीच्या नात्याशिवाय जीवनाला अर्थच उरत नाही. रक्ताचं नातं नसलं तरी जगातील सर्व नात्यांहून श्रेष्ठ असं हे नातं. जे आपल्याला नेहमी हवंहवसं वाटतं. जे आपण स्वतः बनवलेलं असतं. स्वतःपेक्षाही ज्याच्यावर जास्त विश्वास असतो ती मैत्री. मनामनाची ही मैत्री त्याग आणि समर्पणाची शिकवण देते. चांगल्या काळात सगळेच साथ देतात त्याला मैत्री म्हणता येणार नाही, पण वाईट काळातही जो साथ सोडत नाही, जो खंबीरपणे पाठीशी उभा असतो, जो सुखदुःखात साथ देतो ती खरी मैत्री. मैत्री मनात रुजवावी लागते आणि आयुष्यभर हे नातं जीवापाड जपावं लागतं.

- Advertisement -

पु.ल.देशपांडे मैत्रीच्या नात्याविषयी सांगताना म्हणतात, रोज आठवण यावी असं काही नाही, रोज बोललंच पाहिजे असंही काही नाही, रोज भेट झालीच पाहिजे असेही काही नाही, पण मी तुला विसरणार नाही ही खात्री आणि याची तुला झालेली जाणीव असणं ही झाली मैत्री. खरोखरच प्राचीन काळापासून या मित्रत्वाच्या भावनेला फार महत्त्व दिले आहे. मैत्री हा आपल्या जीवनातील अनमोल ठेवा आहे. जीवनात चांगला मित्र नेहमीच आपल्याला प्रोत्साहन देतो, प्रेरणा देतो, आपली उमेद वाढवतो, चांगल्या, वाईटाची जाण करून देत असतो. मैत्रीत नेहमीच एक दुसऱ्याचा आदर केला जातो आणि अप्रत्यक्षपणे जबाबदारीची भावनाही स्विकारली जाते. मैत्रीसाठी कुठल्याही सीमा, बंधने नसतात. दोघांचे विचार आणि मने जुळली की मैत्री फुलते. एकमेकांच्या हृदयात निवास करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मैत्री ही हृदयापासून दिलेली साथ असते. आपल्या हक्काची जागा असते. आपल्या गुणदोषासह जो आपला स्वीकार करतोआणि आयुष्यभर साथ देतो. सतत भेट होत नसली तरी एकमेकात जीव गुंतलेला असतो आणि म्हणूनचं मैत्रीचं पारडं नेहमीच जड असतं. मैत्रीला कुठल्याही तराजूत तोलता येत नाही. जीवाला जीव देणारी ही मैत्री कायमस्वरूपी आपल्या सोबत असते. असं म्हणतात, की मैत्रीचं नातं डोळे आणि हातासारखा असावं. हाताला इजा झाली तर डोळ्यांना पाणी येतं आणि तेच हात डोळे पुसण्यासाठी पुढे येतात. एकटेपणातील सहवास असते मैत्री. आनंदाची चाहूल, उमेद, उत्साह, संकट काळातील मदत आणि आयुष्यभराची संगत असते मैत्री. दूर असलो तरी आठवण काढणारी मैत्री ही मैत्रीच्या नात्यात प्राण भरते. प्रेमात मैत्री नसते पण मैत्रीत प्रेम असते. मैत्री निभावणं तसं कठीण. पण जीथे स्वार्थ नसतो, कपट नसतं तिथे हे नातं कायम विसावतं, विस्तारतं अन् आयुष्यभर फुलत राहतं. म्हणूनच आयुष्यात एक तरी मित्र असावा.

कवी अनंत राऊत म्हणतात, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असला पाहिजे. कारण सर्व नात्यात मैत्रीचचं एक नातं असं आहे जे जिव्हाळ्याचं, काळजीच, हवं तेव्हा आपल्यासाठी खुलं आहे. त्याला कुठलाही चार्ज नाही. कुठलाही टॅक्स नाही. चांगल्या मित्रांची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन आपले चांगले प्रेरणादायी जीवन घडवू शकतं. ‘देव माझा सांगून गेला पोटापुरतं कमव पण जिवाभावाचे मित्र जमव’ खरंच मैत्रीचं हे नातं जे दुसऱ्याच्या हृदयाची सतत काळजी घेत असतं. निखळ, निरागस ही मैत्री कधी परिस्थितीच्या आड येत नाही. आज प्रत्येक माणूस माणसाने वेढलेला आहे पण प्रत्येकालाच खरा मित्र मिळेल हे सांगणे अवघड आहे. संत एकनाथ म्हणतात, प्राणी मात्रात मैत्री असेल तर विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे. सुखदुःखाशी सह्रदय मनाने समरस होणे, दुस-याच्या आनंदात आनंद मानणे, दुःखात आधार देणे हे झाले जीवाचे मैत्र तर यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘भुतां परस्परें पडो, मैत्र जीवांचे’.

खरोखर मैत्री ही श्वासासारखी आहे. जी शेवटपर्यंत आपली साथ देते. आपल्या चुकांवर पांघरून घालून निष्पाप वृत्तीने आपल्याला घडवत असते. कधी कान उघडणी करून तर कधी प्रेमाने. आयुष्यात कधी मोडून पडलो तर पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य सावरण्यासाठी, उभारण्यासाठी ‘मी आहे’ या शब्दातच सर्व सामावलेलं असतं. पावसातला ओलावा आणि मैत्रीचा जीव्हाळ अनमोल असतो. प्रसन्नता, ओढ, विश्वास हाच मैत्रीचा आधार असतो. खऱ्या मैत्रीत कोणतीच गणित नसतात. निरपेक्ष, पारदर्शक, समानतेच्या पातळीवर ही मैत्री वृद्धिंगत होत असते. जगातील एकमेव अमूल्य अशी भेट म्हणजे मैत्री. जीच्या सावलीत आपण आयुष्यभर निर्धास्तपणे चालत असतो. जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी ही मैत्रीच असावी लागते. ज्याची कुठलीच किंमत नसते. मैत्रीला कुठल्याही नियमांची गरज नसते. केवड्याला फळ येत नाही, पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला व्यापून टाकतो तसेच मैत्रीचे आहे. या मैत्रीमुळे जीवनाला आकार येतो, ती लाभावीण प्रीती असते. मैत्रीची गाठ तोडू म्हणता तुटत नाही, विसरू म्हणता विसरता येत नाही. जीवनाच्या अंतापर्यंत प्रत्येक पावलो पावली ती आपली साथ देते. आणि जी फक्त आणि फक्त आपलीच असते. मैत्रीचं हे नातं रक्तापलीकडचं असतं. न बोलताही ज्याला मनाची व्यथा कळते ती मैत्री. नकळत येतात ही नाती आयुष्यात आणि आपलं आयुष्य बनून जातात. मैत्रीला वय नसतं म्हणतात. कारण ती कोणत्याही वयात असली तरी आपल्या चेहे-यावर हसू फुलवते. आनंद, उत्साह वाढवते. म्हणूनच एक तरी मित्र असला पाहिजे आणि या मैत्रीच्या नात्याच्या श्रीमंतीने आपण सर्वांनी समृद्ध झाले पाहिजे.

मलेका शेख- सैय्यद

मो. नं. ९७६३७९६७८३

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या