Saturday, July 27, 2024
Homeनाशिकमणिपूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सटाण्यात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण

मणिपूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सटाण्यात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण

मुंजवाड । वार्ताहर Satana / Munjwad

मानवतेस काळीमा फासणार्‍या हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेला अत्याचार तसेच देशभरात आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक महिला व समुदायांवर वाढलेल्या अत्याचार घटनांच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील वंचित आघाडीसह विविध आदिवासी व पुरोगामी पक्ष संघटनांतर्फे आज तहसील कार्यालयावर धडक अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. हजारोच्या संख्येने महिला, तरूण व नागरिक या मोर्चात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, शांततेत मोर्चा पार पडत असतांना मोर्चातीलच एका गटाने पोलीस ठाण्यालगत रस्त्यावर ठिय्या दिल्याने गोंधळ उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतांना ठिय्या मांडलेल्या संतप्त टोळक्याने पोलिसांवरच दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत हा जमाव पांगवला मात्र पळत असलेल्या टोळक्यातील तरूणांनी दिसेल त्या वाहनावर दगडफेक सुरू करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने शहरात एकच पळापळ होवून दुकाने बंद केली गेली.

नाशिक नाका ते ताहाराबाद नाक्यापर्यंत रस्त्यावर उभ्या असलेल्या मालट्रक, एस.टी. बसेस तसेच खाजगी वाहनांवर टोळक्यांने मोठ्या प्रमाणात दगडफेक केली गेल्याने 7 पोलिसांसह बसमधील प्रवाशी व वाहनचालक जखमी झाले. पोलिसांनी त्वरेने कृती करत ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यासह दगडफेक करणार्‍यांची धरपकड सुरू करत 28 जणांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संवेदनशील भागातून सशस्त्र पोलिसांतर्फे संचलन केले गेल्याने तब्बल दोन ते अडीच तासानंतर निर्माण झालेला तणाव निवळला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

देशातील ठराविक समुदायांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून मणिपूर सारख्या अत्यंत किळसवाण्या घटना महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये घडत असल्याच्या निषेधार्थ आदिवासी मित्र अमोल बच्छाव यांच्यासह विविध आदिवासी संघटना तसेच वंचित बहुजन आघाडी व पुरोगामी पक्ष संघटनांतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज दुपारी 12 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथून या अर्धनग्न मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात सामील झालेल्या नागरीकांनी आपले शर्ट काढून ठेवले होते. घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर येवून धडकल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी मार्गदर्शन करतांना अनेक वक्त्यांनी मानवी मूल्यांना पायदळी तुडविण्याची कृती विशिष्ट समुदाय धार्मिक कट्टरतेच्या आड करीत असल्याची भावना अल्पसंख्यांक समाजामध्ये निर्माण झाली असून देशात हुकूमशाहीचे सरकार असल्याने अत्याचार करणार्‍या या नराधमांना कायदाचा धाक राहिलेला नाही, असा आरोप केला. अन्याय सहन करायचा नाही त्यासाठी एकजुटीने बंड करावेच लागेल असा इशारा या वक्त्यांनी दिला. यावेळी मनीपुर येथे दोघा आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचा संतप्त मोर्चेकर्‍यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

पोलिसांतर्फे धरपकड

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कुमक वाढवत दगडफेक करणार्‍यांची धरपकड सुरू करत 28जणांना ताब्यात घेतले असून इतर दगडफेक करणार्‍यांचा शोध घेतला जात आहे. शांततेसाठी सशस्त्र पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागातून संचलन करीत शक्ती प्रदर्शन केले.

दगडफेक पुर्वनियोजित?

महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आलेला मोर्चा शांततेत पार पडला. महिलांसह हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चाची सांगता झाली असतांना मोर्चातीलच एका टोळक्याने जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हलायचे नाही असा पवित्रा घेत रस्त्यावर ठाण मांडले व समजूत काढण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत या टोळक्यास पांगविले असता त्यांनी मिळेल त्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. त्यामुळे दगडफेकीचा हा प्रकार पुर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकाराची सखोल चौकशी करत दहशत माजविणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांतर्फे केली जात आहे.

सटाणा शहरात तसेच परिसरात शांतता प्रस्थापित असून तणावाचे वातावरण नाही. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिल्यानंतर काही लोकांनी रस्त्यावर बसून पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.त्यात काही जणांनी पोलीस वाहनांसह बस व इतर वाहनांवर दगडफेक केली. 10 पोलीस अंमलदार या घटनेत जखमी झाले असून आतापर्यंत पोलिसांनी दगडफेक करणार्‍या 21 जणांना ताब्यात घेतले आहे. मोर्चाच्या गर्दीचा अंदाज होता. त्यानुसार पोलीस बंदोबस्त देखील होताू मात्र मोर्चानंतर ही घटना घडली आहे. त्वरित अधिक कुमक मागविण्यात आली होती. शहरात तसेच परिसरात सर्वत्र शांतता आहे. पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

– शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या