राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राहुरी येथे शेतकरी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी संचालक अॅड. केरू पानसरे होते. कार्यक्रमास आ. काशीनाथ दाते, माजी आ. लहू कानडे, कैलास पाटील, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे, राजेंद्र नागवडे, अशोक सावंत, कपिल पवार, दिलीप जठार, अमृत धुमाळ, अजीत कदम, घनशाम शेलार, आण्णासाहेब शेलार आदी उपस्थित होते.
ना. अजित पवार म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकरी व समाजाच्या मालकीच्या संस्था असून, त्या नफ्यात व काटकसरीने कशा चालतील, याचा विचार करणे आवश्यक आहे. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये वाढवण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढविण्याचा विचार शेतकर्यांनी करावा. शेतीमध्ये फळबाग लागवड, तीन पिकांनंतर ऊसाच्या बियाण्यात बदल, आणि शाश्वत पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी 20 लाख घरकुले मंजूर केली असून एका घरकुलाच्या बांधकामासाठी 5 ब्रास वाळू ही मोफत उपलब्ध केली जाणार आहे. तसेच लाडकी बहिण योजनेसाठी अर्थसंकल्पात 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. राज्यातील 45 लाख शेतकर्यांची 20 हजार कोटी रुपयांची वीजबिल माफी करण्यात आली आहे. याशिवाय, शेतकर्यांना शून्य टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज दिले जात आहे. शेतकर्यांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असून पाच वर्षांत एकूण 25 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणारे मासिक मानधन दीड हजार रुपयांवरून वाढवून आता अडीच हजार रुपये करण्यात आले आहे.
नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीसाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठीही आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्र शासनाने पुणे ते अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिली असून भूसंपादन प्रक्रियेद्वारे शेतकर्यांच्या जमिनी संपादित करण्यात येऊन त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल. पुणे जवळ असल्याने या नवीन रेल्वे मार्गामुळे शेतकर्यांचा शेतमालास चांगला भाव मिळेल. राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राहुरी बाजार समितीचा समावेश आहे. अरूण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला साखर कारखान्याची पुढची वाटचाल करावी लागेल आणि मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन सहकार खाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं जी काही मदत करता येईल, ती करेल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थितांना दिली.
प्रास्तविकात अरूण तनपुरे म्हणाले, लवकरच सूतगिरणी सुरु करणार असून ती सुरु झाल्यास शेतकर्यांना फायदा होणार आहे. सूतगिरणीच्या जागेत जनावरांचा बाजार आणि पेट्रोल पंप सुरु केला असून तिथे फळांचा बाजार सुरु करणार आहोत. नाशिक आणि लासलगाव प्रमाणे खुला कांदा विक्री सुरु करण्यात येणार असून त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकर्यांना होणार आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभापती अरूण तनपुरे यांच्या घरी स्नेहभोजन केल्यानंतर त्यांचे आजोळ देवळाली प्रवरा येथे भेट दिली. या मेळाव्यात तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरपालिकेचे माजी नगरसेवक, शेतकरी, महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. तनपुरे कारखाना हा राहुरी तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारखाना सुरु होणे गरजेचे असून त्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य निश्चित करीन. यासाठी तुमच्या कर्जाचे ‘वनटाइम सेटलमेंट’, विशेष सवलती तसेच कारखान्यासाठी एनडीसीसीच्या माध्यमातून सहकार्य करून हा कारखाना सुरु करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही ना. अजीत पवार यांनी देऊन मागच्या वेळेस झालेल्या निवडणुकीत तुम्ही कारखान्याचे मालक असताना, नाही त्या लोकांना निवडून दिले. ती मंडळी कारखाना अडचणीत असताना कारखान्याकडे फिरकले का? असा प्रश्न उपस्थित शेतकर्यांना केला.
कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्नेह भोजनासाठी सभापती अरूण तनपुरे यांच्या घरी गेले असता, त्यांचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वागत करून सत्कार केला. यावर माजीमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या घरी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही. ना. पवार यांनी कोणतीही राजकीय चर्चा न करता फक्त कौटुंबिक विचारपूस केल्याचे माजीमंत्री तनपुरे यांनी सांगितले.





