Monday, June 17, 2024
Homeनगरशेतमालाचे मार्केटींग केल्यास शेतकर्‍यांना मोठा फायदा- ना. थोरात

शेतमालाचे मार्केटींग केल्यास शेतकर्‍यांना मोठा फायदा- ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

पिकांच्या मुल्यसाखळी विकासाचे महत्व लक्षात घेवून गटशेती व स्मार्ट योजने सारखे अनेक योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबवल्या जात आहे. सेंद्रिय पध्दतीचा व गुणवत्तापुर्ण फळे – भाजीपाल्यास ग्राहक वर्गातून मोठी मागणी आहे. गटशेती व स्मार्ट सारख्या योजनांचा लाभ घेवून शेतमालाचे एकत्रीत पायाभूत सुविधांची उभारणी करावी व त्यातून शेतमालाचे मार्केटींग केल्यास शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचवण्यास निश्चित मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कृषी विभागाच्या वतीने म्हाळूंगी परिसरात आदिवासी शेतकरी गट फळभाज्या व मार्केटिंग प्रणालीच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर चे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, तहसिलदार अमोल निकम, तालुका कृषि अधिकारी प्रविण गोसावी, साईबाबा संस्थान शिर्डीचे विश्वस्त अ‍ॅड. सुहास आहेर, जयहिंद लोकचळवळीचे कृषि विभाग प्रमुख डॉ. अभय जोंधळे, म्हाळूंगी परिसर आदिवासी शेतकरी गटाचे युवराज डामसे, धनाजी अस्वले, महादू अस्वले, डॉ. निलेश दिक्षीत, महादू अस्वले, प्रकाश नाडेकर, रोहीदास उघडे, राजेंद्र अस्वले, दत्तू अस्वले उपस्थित होते.

यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी व गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत आहेत. अनेक संकटानंतरही या सरकारने शेतकर्‍यांना खूप चांगल्या योजनांचा लाभ दिला आहे. गट शेतीच्या माध्यमातून शेतीला व्यावसायिक रूप येत असून यातून निर्माण होणारा सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. त्याचे चांगले मार्केटिंग केले तर त्याचा मोठा लाभ शेतकर्‍यांना होईल असेही ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सेंद्रिय शेतीवर शेतकर्‍यांनी भर दिला पाहिजे. सेंद्रिय भाजीपाला व फळांना शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मोठी मागणी वाढली आहे. मागणी तसा पुरवठा हा उद्देश शेतकर्‍यांनी ठेवावा असेही ते म्हणाले.

कृषि विभागाकडील गटशेती योजनेच्या माध्यमातून शेतकरी गटाच्या सदस्यांच्या शेतात 25 एकर क्षेत्रात शेडनेट उभारणी केली आहे. संरक्षित शेती तंत्रज्ञनावर आधारीत भाजीपाला उत्पादन हाती घेतले आहे. मुंबई, ठाणे व पुणे शहरातून म्हाळूंगी गावात उत्पादीत होणार्‍या वैशिष्ट्य पुर्ण शेतमालास मोठी मागणी असल्याचे व परदेशी भाजीपाला उत्पादनात देखील गावातील शेतकर्‍यांचा हातखंडा असल्याची माहिती गटाचे प्रमुख युवराज डामसे यांनी दिली.

तांदूळ प्रकिया व विक्रीसाठी राईस मिल, तेलघाणी, भाजीपाला संकलन व प्रतवारी केंद्रासाठीचे आवश्यक यंत्रे, मशागतीचे कामे करण्यासाठी ट्रॅक्टर व औजारे बँकेचा लाभ कृषि विभागामार्फत मिळाला असल्याची माहिती गटाचे संचालक धनाजी अस्वले यांनी दिली. आज लोकार्पण करण्यात आलेल्या शितवाहाना द्वारे नाशवंत असणार्‍या भाजीपाला व फळांचा दर्जा अबाधित ठेवून थेट ग्राहकांना गुणवत्ता पुर्ण माल मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे परिसरातील भाजीपाल्याचा नावलौकीक वाढीस लागून शेतमालाच्या ब्रॅन्डींग साठी सदरच्या बाबी आवश्यक असल्याच्या सूचना ना. थोरात यांनी उपस्थितांना केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले तर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या