अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
हिंदू विधींमध्ये विवाह खूप महत्त्वाचा आणि पवित्र विधी मानला जातो. वैदिक शास्त्रानुसार, विवाह हे एक पवित्र नाते असून, ते शुभ मुहूर्तावरच झाले पाहिजे. सर्व शुभ कार्यांसाठी जसे शुभ मुहूर्त अन् वेळ व तारीख असते. तसेच लग्नासाठीही शुभ मुहूर्त आणि तारीख असते. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी शुभ वेळ आणि तारीख निश्चित करणे महत्त्वाचे आहे. कारण- विवाह म्हणजे एक मिलन आहे; जे दोन व्यक्तींना, तसेच दोन कुटुंबांना एकमेकांशी जोडते आणि आयुष्यभराच्या सुंदर नात्यात बांधते. त्यामुळे कुंडली जुळण्याबरोबर लग्नाच्या शुभ तारखा आधी पाहिल्या जातात. दरम्यान, 12 नोव्हेंबरपासून लग्नाचा बार उडणार आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2024 या महिन्यात लग्नाच्या तारखा नव्हत्या. त्यामुळे अनेकांना नोव्हेंबर, डिसेंबरची वाट पाहावी लागली
नोव्हेंबर 2024 मध्ये 7 तारखांना मुहूर्त आहेत. 12, 16, 17, 18,24, 25, 27 तर डिसेंबर 2024 मध्ये आठ मुहूर्त आहेत. 2, 4, 5, 9, 10, 11, 14.
नव्या 2025 वर्षात अनेक मुहूर्त आहेत. पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुहूर्त नाहीत.त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. जानेवारी 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त -जर तुम्हाला हिवाळ्यात लग्न करायचे असेल, तर तुमच्यासाठी लग्नाच्या शुभ तारखा निवडण्यासाठी जानेवारी हा सर्वांत चांगला महिना असू शकतो. या जानेवारी महिन्यात लग्नासाठी 10 शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार जानेवारी 2025 मध्ये 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26 व 27 या 10 तारखा विवाह सोहळ्यासाठी सर्वांत शुभ मानल्या जातात.
फेब्रुवारी 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त –
फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हटले जाते. कारण- या महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. त्यामुळे अनेक जण 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण, या महिन्यात लग्नासाठी इतरही अनेक शुभ मुहूर्त आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 18, 19, 21, 23 व 25 हे दिवस लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत.
मार्च 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त –
मार्च हा विवाहसोहळ्यांसाठी एक विशेष महिना मानला जातो. या महिन्यात लग्नाच्या तारखा निवडून, तुम्ही तुमच्या लग्नाचे नियोजन करू शकता. मार्च 2025 मध्ये लग्नासाठी पाच शुभ मुहूर्त आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार, 1, 2, 6, 7 व 12 मार्च 2025 हे लग्न समारंभांसाठी शुभ मानले जातात.
एप्रिल 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त –
मार्चप्रमाणे एप्रिल महिन्यातही अनेक जण लग्नाचा मुहूर्त ठरवतात. कारण- मे महिन्याच्या तुलनेत या महिन्यात उकाडा तुलनेने कमी असतो. त्याशिवाय या महिन्यापासून सुट्या सुरू होतात. त्यामुळे सुट्यांचे नियोजन पाहून अनेक जण लग्नाचा मुहूर्त ठरवतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार एप्रिल 2025 मध्ये लग्नाचे नऊ मुहूर्त आहेत. 14, 16, 18, 19, 20, 21, 25, 29 व 30 या तारखांना विवाह सोहळ्यासाठी विशेष महत्त्व आहे.
मे 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त
मे महिन्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्या असल्याने अनेक कुटुंबांत लग्नासाठी हा महिना निवडला जातो. कारण- यानिमित्ताने कुटुंबातील सर्वांना लग्नकार्यात सहभागी होता येईल, असा उद्देश असतो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की, महाराष्ट्रात मे महिन्यात सर्वाधिक विवाहसोहळे पार पडतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार मे महिन्यात विवाह सोहळ्यासाठी 15 शुभ तारखा आहेत. मे 2025 मध्ये 1, 5, 6, 8, 10, 14, 15, 16, 17, 18, 22, 23, 24, 27 व 28 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.
जून 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त
अनेक जण मे महिन्यातील उकाडा संपल्यानंतर म्हणजे जूनमध्ये लग्नाचा घाट घालतात. भले जूनपासून पाऊस सुरू होत नाही; पण उकाडा तरी काही प्रमाणात का होईना कमी झालेला असतो. त्यामुळे काही जण मे महिन्यापेक्षा जूनमध्ये लग्नाची तारीख ठरवतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, जूनमध्ये विवाह सोहळ्यासाठी पाच शुभ तारखा आहेत. जून 2025 मध्ये 2, 4, 5, 7 व 8 या तारखा लग्नकार्यासाठी शुभ आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त नाहीत
धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल नसते, तेव्हा लग्नाचे शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे 2025 मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत नक्षत्रांची स्थिती योग्य नसल्यामुळे लग्नासाठी शुभ मुहूर्त नाहीत.
नोव्हेंबर 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त –
2025 मध्ये दिवाळी सण सप्टेंबर महिन्यात आहे आणि तो सण संपल्यानंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी काही खास मुहूर्त आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार 2025 मध्ये नोव्हेंबर महिन्यात 14 शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर महिन्यात तुम्ही 2, 3, 6, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25 व 30 तारखेला लग्न समारंभ आयोजित करू शकता.
डिसेंबर 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त
सर्व सण-उत्सव संपल्यानंतर डिसेंबर महिना सुरू होतो. पण, या महिन्यातही अनेक जण ख्रिसमसच्या सुट्या लक्षात घेऊन विविध मनसुबे ठरवितात. त्यामुळे कुटुंबातील सुट्यांचे नियोजन लक्षात घेत, डिसेंबर महिन्यात लग्नाचा मुहूर्त ठरवला जातो. तसेच थंडीचे दिवस सुरू असतात. त्यामुळे हा काळ लग्नकार्यासाठी अनुकूल ठरतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार डिसेंबर 2025 मध्ये 4, 5 व 6 डिसेंबर या तारखा लग्नकार्यासाठी शुभ आहेत.
पुढार्यांची धावपळ उडणार
विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर या महिन्यात 12, 16, 17, 18, या तारखांना विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी तसेच लग्नांच्या निमित्ताने प्रचाराची संधी मिळणार असल्याने विवाहस्थळी उपस्थित राहण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धावपळ होणार आहे.