अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीत विवाहिता जखमी झाल्याची घटना रविवारी (30 मार्च) दुपारी मल्हार चौक, रेल्वे स्टेशन रस्ता येथे घडली. आफीया मोहम्मदअली शेख (वय 30 रा. माजलगाव, बीड) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ईद सणानिमित्त माजलगाव येथून आपल्या सासरी मल्हार चौक, आयकॉन शाळेजवळ रेल्वे स्टेशन रस्ता येथे आल्या होत्या.
रविवारी दुपारी तीन वाजता त्या आपल्या सासरच्या घरी पोहोचल्या असता, त्यांच्या सासू परविन शकिल मणियार (वय 50) यांनी त्यांच्याकडे प्लॉटच्या कागदपत्रांची विचारणा केली. फिर्यादीने ईद निमित्त आल्याचे सांगताच, त्यांच्या सासूने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यानंतर, सासूने त्यांच्या पती सलमान शकिल मणियार (वय 35) व दीर सुफियान मणियार यांना फोन करून बोलावले. पती व दीर घरी आल्यानंतर, सासूने प्लॉटच्या कागदपत्रांबद्दल तक्रार केली आणि त्यानंतर फिर्यादी मारहाण करण्यात आली. सासरे शकिल मणियार (वय 55) यांनी देखील हातभार लावला. दरम्यान, पीडितेच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.