अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे राहत असलेल्या विवाहितेचा सासरी हुंड्यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडिताने बुधवारी (14 मे) दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरूध्द शारीरिक व मानसिक छळाच्या आरोपावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती सुजीत बाजीराव तोडमल, सासू सिंधू बाजीराव तोडमल, सासरे बाजीराव काशिनाथ तोडमल (तिघे रा. तपोवन रस्ता, श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, 4 फेब्रुवारी 2024 ते 30 मार्च 2024 या कालावधीत त्यांना त्यांच्या सासरी म्हणजेच श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, तपोवन रस्ता येथे सासरच्या लोकांनी कृषी सेवा केंद्र उभारण्यासाठी माहेरच्यांकडून 10 लाख रुपये घेऊन यावेत म्हणून दबाव टाकला.
तसेच, या मागणीस नकार दिल्यामुळे त्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. संशयित आरोपींनी पीडितेला जाणीवपूर्वक दीर्घ काळ शेतामध्ये काम करायला लावले, उपासमार केली आणि मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस अंमलदार जगदीश जंबे अधिक तपास करीत आहेत.