अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळच्या गणेशनगर (ता. शेवगाव) येथील रहिवासी व सध्या उघड मळा, वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारात राहत असलेल्या पीडित विवाहितेने या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (27 नोव्हेंबर) फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती योगेश रमेश दसपुते, सासू कल्पना रमेश दसपुते, सासरा रमेश त्रिंबक दसपुते, दीर आदेश रमेश दसपुते (सर्व रा. गणेशनगर, शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सदरची घटना 9 डिसेंबर 2020 ते जून 2023 दरम्यान फिर्यादीच्या सासरी गणेशनगर, शेवगाव येथे घडली आहे. फिर्यादी यांचा विवाह 9 डिसेंबर 2020 रोजी योगेश रमेश दसपुते याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर चार महिन्यांनी वेगवेगळ्या कारणाने व फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आणावे यासाठी सासरच्यांनी फिर्यादीचा छळ केला. वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी सदर छळाला कंटाळून बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी करत आहेत.