अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घर घेण्यासाठी माहेरून पाच लाख आणावेत म्हणून विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने मंगळवारी (दि. 18) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू-सासरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती प्रशांत बाळासाहेब गव्हाणे, सासरे बाळासाहेब उमाजी गव्हाणे, सासू लीलावती बाळासाहेब गव्हाणे (सर्व रा. खडकी, अधोरेवाडी, ता. श्रीगोंदा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये फिर्यादी यांचा विवाह प्रशांत गव्हाणे सोबत झाला आहे. विवाह झालेच्या दुसर्या दिवसापासून फिर्यादी सासरी नांदत असताना पतीसह सासू-सासर्यांनी त्यांचा छळ सुरू केला. घर खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला.
आई- वडिलांची परिस्थिती नसल्याचे सांगितल्यानंतरही विवाहितेचा सासरी छळ सुरूच होता. 6 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादी यांना घरातून काढून दिले. तेव्हापासून त्या माहेरी नगर येथे आई-वडिलांकडे राहत आहेत. त्यांनी भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, भरोसा सेलमध्ये समझोता न झाल्याने त्यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.