अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सध्या बोल्हेगाव उपनगरात राहत असलेल्या 38 वर्षीय विवाहित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती व सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार पुणतांबा व ममदापुर (ता. राहाता) येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती प्रमोद अशोक दाभाडे, सासरे अशोक गंगाधर दाभाडे, सासु रंजना अशोक दाभाडे, नणंद राणी मनोज घोडेकर (सर्व रा. पुणतांबा ता. राहाता) व नणंद हर्षदा शिवाजी भालेराव (रा. ममदापुर, ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा विवाह 7 एप्रिल 2024 रोजी प्रमोद दाभाडे यांच्याशी आळंदी येथे झाला होता. सुरूवातीला एका महिन्यापर्यंत सासरी सुखाने नांदवल्यानंतर मे 2024 पासून पती प्रमोद याने गाई घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला. पैसे न दिल्यास वारंवार शिवीगाळ, मारहाण होत असल्याचे फिर्यादीने सांगितले. तसेच, सासरे अशोक दाभाडे व सासु रंजना दाभाडे हेही शिवीगाळ करून मारहाण करत असत. काही वेळा पैशांची मागणी पूर्ण केली असली तरी पती प्रमोद सतत तू म्हातारी आहेस अशा अपमानास्पद वागणूक देऊन शारीरिक-मानसिक छळ करत असे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, नणंद हर्षदा भालेराव व राणी घोडेकर या वारंवार माहेरून खर्च आणण्याचा तगादा लावत होत्या. एप्रिल 2025 मध्ये फिर्यादी गर्भवती असताना पती व सासरच्यांनी आम्ही तुला व हे मूल संभाळणार नाही असे म्हणून मारहाण केली, शिवीगाळ केली व उपाशी ठेवत घराबाहेर काढून दिले. त्यामुळे ती माहेरी अंबाजोगाई (जि. बीड) येथे परत गेली. यानंतर पीडितेने भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली होती, मात्र समेट न झाल्याने अखेर तिने थेट तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलीस अंमलदार रमेश शिंदे अधिक तपास करीत आहेत.




